दरवर्षी वातावरणात मिसळते 200 कोटी टन धूळ!

दरवर्षी वातावरणात मिसळते 200 कोटी टन धूळ!

वॉशिंग्टन : हवेतील अस्तित्वात असलेली धूळ आणि वाळू ही मुळातच मोठी समस्या झाली आहे. सध्याही दरवर्षी वातावरणात थोड्याथोडक्या नव्हे तर 200 कोटी टन धूळ व वाळू समाविष्ट होत असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले आहे. या कारणामुळे दरवर्षी जवळपास 10 लाख चौरस किलोमीटर पिकाऊ जमीन देखील नष्ट होत असल्याची भयंकर बाब समोर आली आहे.

युएन कन्वेंशन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनच्या अहवालात या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालानुसार, धूळ आणि वाळूचा समावेश असलेल्या तुफानांची 25 टक्के निर्मिती ही मनुष्यांशी निगडीत विविध कारणामुळे होते आहे. या धूळ आणि वाळूचे वजन गिझातील 350 महान पिरॅमिडच्या बरोबरीचे आहे, यावरुन देखील याचे गांभीर्य स्पष्ट होते.

जगभरातील अनेक भागात धूळ व वाळूचे प्रमाण इतके वाढले आहे की, त्यामुळे वातावरणाचा समतोल पूर्ण बिघडला असून अशा भागातील प्रदूषण अतिशय धोकादायक स्तरावर पोहोचले आहे. उत्तर आणि मध्य आशियापासून उपसहारा आफ्रिकेपर्यंत याचा प्रकोप दिसून येतो आहे. वातावरणातील प्रचंड धूळ व रेतीमुळे जमिनीचा पोत तर बिघडत चालला आहेच. पण, त्याही शिवाय जगभरात कृषी व आर्थिक स्तरावर त्याचे मोठे फटके सोसावे लागत आहेत. युएनसीसीडीच्या आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी 10 लाख चौरस किमी पिकाऊ जमीन नष्ट होत चालले असून 2015 ते 2019 या कालावधीत हे प्रमाण एकूण 42 लाख चौरस किलोमीटर्सपर्यंत पोहोचले आहे. ही जागा कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान या पाच मध्य आशियाई देशांच्या एकत्रित क्षेत्रफळाइतकी आहे.

अस्थमा आणि श्वासाशी संबंधित अन्य विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना धूळ व रेतीच्या प्रमाणाचा सर्वाधिक धोका असतो. धूळ व रेतीच्या कणाचा व्यास 0.05 मिलिमीटर इतका कमी असतो आणि यामुळे ते वार्‍याच्या प्रवाहाने कित्येक हजारो किलोमीटर्सचा प्रवास अगदी सहजपणे करू शकतात. याचवेळी यातील काही कण यापेक्षाही मोठे असू शकतात आणि ते ही अमर्यादित प्रमाणात प्रवास करून वातावरणाचा समतोल बिघडवू शकतात, असे निष्पन्न झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news