राज्यातील मलेरिया रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी घट

राज्यातील मलेरिया रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी घट
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात 2021 सालच्या तुलनेमध्ये 2022 मध्ये हिवताप दूषित रुग्णांमध्ये 20 टक्के घट झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 2021 मध्ये तपासणी करण्यात आलेल्या 1 कोटी 34 लाख रक्तनमुन्यांपैकी 19 हजार रुग्ण आढळून आले. तर, 2022 मध्ये तपासण्यात आलेल्या 1 कोटी 65 लाख नमुन्यांपैकी 15 हजार रुग्ण आढळून आले. 2023 मध्ये आतापर्यंत 1487 मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत.

जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. यासाठी यंदा 'झीरो मलेरिया'चे घोषवाक्य ठरवण्यात आले आहे. याच अनुषंगाने वर्षभर ग्रामीण व शहरी भागामध्ये हिवताप रुग्णसंख्या शून्य येईल, यादृष्टीने कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे.

राज्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या 5 जिल्ह्यांमध्ये शून्य हिवताप दूषित रुग्णसंख्या आढळून आली आहे. तर, 1 ते 10 रुग्णसंख्या असलेले भंडारा, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, वर्धा, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, वाशिम, सांगली, बीड, सोलापूर, औरंगाबाद, जालना, यवतमाळ हे 16 जिल्हे आहेत.

कशामुळे होतो मलेरिया?

मलेरिया अर्थात हिवताप हा आजार प्लाझमोडियम या परोपजीवी जंतूपासून होतो. राज्यात प्रामुख्याने प्लाझमोडियम व्हायवॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोन जाती आढळून येतात. त्यापैकी प्लाझमोडियम फॅल्सिपेरम हा अत्यंत घातक असून, त्यामुळे मेंदूचा हिवताप होऊन रुग्ण दगावू शकतो. हिवतापाचा प्रसार दूषित अनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो.

काय आहेत लक्षणे ?

  • थंडी वाजून ताप येणे.
  • ताप हा सतत असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो.
  • घाम येऊन अंग गार पडणे
  • ताप आल्यानंतर डोके दुखणे
  • उलट्या होणे.

रोगनिदान

  • हिवतापाचे निदान सर्वसाधारणपणे रक्तरनमुन्यांची सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे तपासणी करून किंवा अ‍ॅन्टीजेनयुक्त रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किटचा वापर करून केले जाते.
  • सर्वसाधारणपणे रक्तनमुन्यांतील हिवताप परजीवी शोधण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राव्दारे तपासणी करण्याची पद्धत वापरली जाते.

औषधोपचार

  • पी. व्हायव्हॅक्सच्या रुग्णांना क्लोरोक्विन व प्रायमाक्विन
    14 दिवसांचा समूळ उपचारात गोळ्या पर्यवेक्षणाखाली दिल्या जातात. पी. फॅल्सीपॅरम रुग्णांना प्रायमाक्विन व आर्टीसुनेट गोळ्या दिल्या जातात.

राज्यातील हिवताप रुग्ण
वर्ष      मलेरिया रुग्ण
2020    12909
2021    19303
2022     15451
2023 (मार्चपर्यंत) 1487

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news