पुणे शहराच्या विकासासाठी 2 हजार कोटी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

पुणे शहराच्या विकासासाठी 2 हजार  कोटी : उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांचे आश्वासन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराच्या विविध विकासकामांसाठी दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे आले आहेत. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा केली असून, त्यांनी मान्यता दिली आहे. लवकरच याबाबत प्रशासकीय मान्यता पाठवू. महापालिकेने कामे सुरू करावीत,' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. महापालिकेने गोल्फ क्लबजवळ बांधलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले.

त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, खासदार संजय पाटील, योगेश टिळेकर, बापू पठारे, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले, योगेश मुळीक, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आदी उपस्थित होते. या वेळी फडणवीस यांच्या हस्ते अन्य काही विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, 'अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन केले. विक्रमी वेळेत हा प्रस्ताव केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आपण मंजूर करून घेतला. तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर यांच्यासोबत मी त्यासाठी प्रयत्न केले. गेल्या पाच-सहा वर्षांत महापालिकेने अनेक मोठी कामे केली. विकास आराखडा मंजूर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला. दुसर्‍या टप्प्यावरील मेट्रो लवकरच धावू लागेल. मेट्रोच्या पुढील विस्तारित मार्गाचे प्रस्ताव राज्य सरकारकडे आले आहेत, त्यांनाही मान्यता देण्यात येईल,' असे त्यांनी सांगितले. 'पुण्याचा वाहतूक प्रश्न मिटविण्यासाठी शहराबाहेरून जाणार्‍या रिंगरोडचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. त्याच्या भूसंपादनासाठी दहा ते पंधरा हजार कोटी रुपये लागणार आहेत. तो झाल्यानंतर पुण्याचा सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा आर्थिक कॉरिडॉर सुरू होईल,' असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, 'देशात इलेक्ट्रिक व सीएनजीवर चालणार्‍या गाड्यांचा सर्वाधिक ताफा पीएमपीएमएलकडे आहे. त्यांचे दरही कमी आहेत. हेमंत रासने यांनी 'दहा रुपयांत बसप्रवास' ही नवी संकल्पना राबविली. पुण्यात नदीसुधार प्रकल्प राबवित आहोत. 24 बाय 7 या पाणीपुरवठा योजनेने सर्वांना पुरेसे पाणी मिळेल. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यात येईल. माधुरी मिसाळ या त्याचा पाठपुरावा करीत असतात.'

फडणवीस म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांनी 28 वॉर्डांमध्ये नाल्याभोवती संरक्षणभिंत बांधण्यासाठी सातशे कोटी रुपयांची मागणी केली आहे. योगेश टिळेकर यांनी कात्रज – कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 268 कोटी रुपये मागितले आहेत. पुण्यातील विविध भागात उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधण्यासाठी बाराशे कोटी रुपयांची मागणी केली आहे.

महापालिकेकडून असे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. हे एकूण दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आले असून, ते मान्य केले जातील. मुंबई पाठोपाठ पुणे हे ग्रोथ इंजिन असून, पुण्याची वाटचाल शाश्वत विकासाकडे होत आहे.' पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणे झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी आभार मानले. गुंडगिरीवर कारवाईच्या पोलिसांना सूचना

'पुणे हे आयटी, मॅन्युफॅक्चरिंगचे हब आहे. पुण्यात नवीन रोजगारनिर्मिती होऊ शकते. मात्र, नव्याने येत असलेल्या उद्योगांना कोणी त्रास देत असल्यास, ती गुंडगिरी मोडून काढण्याच्या सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत,' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news