Australia vs Pakistan : डेव्हिड वॉर्नरचे धडाकेबाज दीडशतक

Australia vs Pakistan : डेव्हिड वॉर्नरचे धडाकेबाज दीडशतक

पर्थ, वृत्तसंस्था : पर्थ कसोटी (Australia vs Pakistan) सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 164 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यामुळे कांगारूंना दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाच विकेटस्वर 346 धावांपर्यंत सहज मजल मारता आली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मिचेल मार्श 15 आणि अ‍ॅलेक्स कॅरी 14 धावांवर खेळत आहेत. पाकिस्तानची कमकुवत गोलंदाजी आणि विस्कळीत क्षेत्ररक्षण याचा फायदा घेत यजमान संघाने 4 हून अधिकच्या रनरेटने धावा वसूल केल्या. पाक गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी अक्षरश: हतबल दिसले.

पर्थ कसोटीच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाने आक्रमक फलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्याच षटकात 14 धावा करून ऑस्ट्रेलियाने आपले इरादे स्पष्ट केले होते. वॉर्नरने सलामीवीर उस्मान ख्वाजासोबत पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली.

ख्वाजाला (41 धावा) शाहीन आफ्रिदीने बाद केले. यानंतर मार्नस लॅबुशेन फार काळ टिकू शकला नाही आणि 16 धावा करून फहीम अश्रफचा बळी ठरला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 159 धावांवर दुसरी विकेट गमावली. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नरने मिळून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 238 धावांपर्यंत नेली. खुर्रम शहजादने स्मिथला (31) तंबूत पाठवले. ट्रॅव्हिस हेडने 40 धावांची झटपट खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. आमीर जमालने ट्रॅव्हिसची विकेट घेतली. 321 धावांवर ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या रूपाने पाचवी विकेट गमावली.

पहिल्या दिवशी पाकिस्तानचा मारा कमकुवत दिसला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर पाक गोलंदाज धावगती नियंत्रित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. विकेटसाठी त्यांना झगडावे लागले. जमालने दोन, तर शाहीन, खुर्रम आणि फहीमने प्रत्येकी एक विकेट घेतली.

या कसोटी सामन्यातून आमीर जमाल आणि खुर्रम शहजाद यांनी पाकिस्तानकडून पदार्पण केले. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर नवीन कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा हा पहिलाच कसोटी सामना आहे.

वॉर्नरच्या कसोटी क्रिकेटमध्ये 8,500 धावा पूर्ण (Australia vs Pakistan)

या खेळीदरम्यान डावखुर्‍या वॉर्नरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. आपल्या संस्मरणीय खेळीदरम्यान 13 वी धाव घेताच त्याने कसोटी करिअरमधील 8,500 धावा पूर्ण केल्या. माजी कर्णधार रिकी पाँटिंग (13,378), अ‍ॅलन बॉर्डर (11,174), स्टीव्ह वॉ (10,927), स्मिथ (9,320), मायकेल क्लार्क (8,643) आणि मॅथ्यू हेड (8,625) यांच्यानंतर वॉर्नर साडेआठ हजार धावांचा आकडा गाठणारा 7 वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. यादरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11,000 धावाही पूर्ण केल्या.

वॉर्नरचे हे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्धचे 10 वे शतक आहे. त्याने याबाबतीत लाराला मागे टाकले. विंडीजच्या लाराने पाकिस्तानविरुद्ध 70 डावांत 9 शतके झळकावली होती; परंतु वॉर्नरने केवळ 47 व्या डावात 10 वे शतक झळकावले.

स्मिथच्या पाकविरुद्ध एक हजार धावा

स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी करिअरमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. त्याने पाकविरुद्ध 13 कसोटी सामन्यांच्या 20 डावांमध्ये 53.26 च्या सरासरीने 1,012 धावा केल्या आहेत. यात 8 अर्धशतके, 2 शतकांचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा 9 वा फलंदाज ठरला आहे.

वॉर्नरचे कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक

37 वर्षीय वॉर्नरची ही शेवटची कसोटी मालिका आहे. अशातच त्याने आपल्या लौकिकानुसार फलंदाजी केली आणि कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक झळकावले. हे त्याचे पाकिस्तानविरुद्धचे सहावे कसोटी शतक ठरले. 77.73 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 211 चेंडूंत 164 धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटने 16 चौकार आणि 4 षटकारही मारले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news