बहार विशेष : शिवकाल जागवण्यासाठी हवे स्वतंत्र मंत्रालय!

शिवकाल जागवण्यासाठी हवे स्वतंत्र मंत्रालय!
शिवकाल जागवण्यासाठी हवे स्वतंत्र मंत्रालय!

चार शतकांपूर्वी देशाच्या कालचक्राची गती बदलणारे, राष्ट्रीय जाणिवेची चेतना जागविणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांची 400 वी जयंती अवघ्या सहा वर्षांवर आली आहे. देशाच्या अमृतकाळात छत्रपतींच्या 'चतु:जन्मशताब्दी' वर्षाचे साक्षीदार होण्याची संधी आजच्या पिढीला आहे. त्यासाठी 'स्व', 'राज्य' आणि 'रयत' या तीन पातळ्यांवर आपल्याला काय करता येईल, याचा ऊहापोह करणारा हा लेख उद्याच्या (दि. 19 फेब्रुवारी) शिवजयंतीनिमित्ताने…

केवळ मराठीच नव्हे, तर समस्त हिंदुस्थानच्या मनामनांवर गेली 394 वर्षे राज्य करणारे, धैर्य, साहस, पराक्रम, शक्ती-भक्ती, साक्षेप व मर्यादा, कुलीन व शालीन, पुरोगामी व अर्वाचीन, ज्ञान, भक्ती, वैराग्य, विवेक आणि कलेचे धनी असणारे जाणता राजा, श्रीमंत योगींच्या 394 व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन. या अभिवादनात शिवरायांविषयी काही निवडक विशेषणे आणि दोनवेळा 394 व्या जयंतीचा उल्लेख करण्याचे प्रयोजन काय? खरं तर 394 सुद्धा अनेक अंकांपैकी एक! त्याची संधी करायची झाली, तर 400 उणे 6 अशीही करता येईल. अर्थात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 400 व्या जयंतीला आता अवघी सहा वर्षे राहिली आहेत. 1930 साली साजरी झालेली महाराजांची 300 वी जयंती, 'याची देही, याची डोळा' पाहिलेली मंडळी आपल्यात फार क्वचित असण्याची शक्यता आहे. 2130 सालची पाचशेवी जयंती तर आपल्या हयातीत होणे नाही. त्यामुळे महाराजांची 400 वी म्हणजेच चतुर्थ जन्मशताब्दी साजरी करण्याची सुवर्णसंधी मात्र आपल्या पिढ्यांना लाभली आहे. या चतु:जन्म शताब्दीचा विचार आतापासून केला, तर आजपासूनच्या सर्वच शिवजयंती सोहळ्यांना एक अर्थ आपण देऊ शकू.

स्वराज्य आणि सुराज्य या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या दोन प्रमुख संकल्पना. त्यांचा मागील चारशे वर्षांचा आलेख मांडला, तर स्वराज्य, संघर्ष, स्वराज्य विस्तार, पारतंत्र्य आणि पुन्हा स्वराज्य असा त्याचा प्रवास राहिला. 2030 साली महाराजांची चतु:जन्मशताब्दी समोर असणार्‍या आपल्या पिढीसमोर स्वातंत्र्य किंवा स्वराज्यासाठीचा संघर्ष नाही. वारसाहक्काने मिळालेले स्वराज्य अधिकाधिक सुराज्य करण्याचे आव्हान मात्र समोर आहे. छत्रपतींच्या सुवर्णकाळात नसलेले श्रीराम मंदिर आज अयोध्येत उभे आहे. त्यामुळे रामराज्य व शिवशाही या समानार्थी संकल्पना भावी पिढीसमोर आपण कशा आणतो, हे आपल्या आजच्या आचार-विचारांवर अवलंबून असेल. म्हणूनच महाराजांच्या चतु:जन्मशताब्दीचा सोहळा म्हणजे एक दिवस किंवा आठवड्याचा सरकारी सोहळा ठरू नये.
400 किंवा 500 हे आकडे नसून अनंताकडे नेणारे मैलाचे दगड आहेत. त्यामुळे शिवरायांच्या येणार्‍या 400 व्या जयंतीची सुवर्णसंधी अधिक व्यापक व अर्थपूर्ण करण्यासाठी तयारीचे नियोजन आपल्याला तीन स्तरांवर करता येईल.

पहिला स्तर : आपले सरकार-शासन. म्हणजेच राज्य हा घटक. दुसरा स्तर : शिवरायांवर अतोनात श्रद्धा व नितांत प्रेम असलेले शासनेतर घटक – म्हणजे रयत, म्हणजेच आपण जनता. आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर सामाजिक संस्था, संघटना, सिव्हिल सोसायटी आणि तिसरा स्तर : म्हणजे स्वराज्यातला 'स्व' हा घटक. वैयक्तिक पातळीवर शिवप्रेरणेने संचालित होणारा, त्यांच्या शिकवणीवर अंमल करू इच्छिणारा प्रत्येक नागरिक. या तिन्ही घटकांना पुढच्या सहा वर्षांत असे काय करता येईल की, येणारा चतुर्थ शिवजन्म शताब्दी सोहळा महाराष्ट्राच्या आयुष्यातील आमूलाग्र बदलाची नांदी ठरू शकेल, राजेंना साजेशी अविस्मरणीय चळवळ ठरेल.

अ) पहिली तयारी शासनस्तरावरची असेल : 400 वी शिवजयंती ही केवळ केंद्र किंवा महाराष्ट्र सरकारचा विषय नसेल; तर हा सोहळा सर्वच राजकीय पक्ष, दक्षिणेकडील सर्व राज्ये, उत्तर, पश्चिम, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांच्याही अभिमानाचा बिंदू असावा. सर्वच शासनांनी भारत सरकारच्या समन्वयाखाली शिवाजी महाराजांची शिकवण व प्रेरणा तळागाळात रुजवण्यासाठी काही सामाजिक योजना आखायला हव्यात.

सोहळ्याला महाराष्ट्र शासनाने ठोस आकार देण्यासाठी एका नव्या मंत्रालयाची स्थापना करायला हवी. हे 'शिवजन्म चतु:शताब्दी' मंत्रालय असू शकेल. नावातच शिव असार्‍या या शिवजन्म शताब्दी मंत्रालयाची उभारणी शिवाजी महाराजांच्या वैचारिक अधिष्ठानावर व्हावी. त्याचे स्वरूप व कार्यपद्धती प्रचलित मंत्रालयांसारखी नसावी; तर शिवाजी महाराजांच्या वैश्विक, सर्वसमावेशक, विशाल व नीतिमूल्यांवर आधारित हवी. या मंत्रालयात सर्वच जाती, धर्म, बलुते, महिला, दिव्यांग व राजकीय पक्षांचे विचारवंत आणि चारित्र्यसंपन्न मंडळी असावीत. आणखी एक सरकारी काम असे न समजता आपल्या कार्यात तळपून निघणारी कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची फळी या मंत्रालयात असायला हवी. या 'शिवजन्म शताब्दी' मंत्रालयाच्या निधीतला एक रुपयाही अनाठायी किंवा भ्रष्ट आचरणाच्या कामी येणार नाही, अशी पारदर्शक व विश्वासार्ह अष्टप्रधान यंत्रणा या मंत्रालयास लाभावी.

पुढच्या सहा वर्षांत कोणत्याही पक्षाचे सरकार आले, तरी हे मंत्रालय तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या थेट देखरेखीखाली राहावे. सर्व पक्षांचे मिळून मुख्य विषयांना सांभाळणारे चार-पाच राज्यमंत्री या मंत्रालयात असावेत. सरकार स्थापनेच्या वेळी जसा शपथविधी सोहळा होतो तसा शिवजन्म शताब्दी मंत्रालयाचा शपथविधी सोहळा रायरेश्वराच्या मंदिरात करायला हवा. हे असे अनोखे मंत्रालय आधुनिक भारतातील लोकशाहीतील एक नवा प्रयोग ठरू शकते. शिवजन्म शताब्दी मंत्रालयाने मुख्यतः शासनस्तरावरील शताब्दीपूर्तीची कामे योजावीत, त्यांचा निधी हाताळावा. मुख्य सोहळा अवघ्या सहा वर्षांवर असल्याने दर्जेदार पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करावीत, विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी करावी. या मंत्रालयाच्या स्तरावरून करायच्या काही कामांची विषयवार सूची पुढीलप्रमाणे असू शकते…

1) किल्ले व गडकोट संधारण : यात तोरणा गडापासून रायगडापर्यंत छोट्या-मोठ्या सर्व गडकोटांचे संवर्धन करता येईल. ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक पद्धतीने त्यांचे संवर्धन करता येईल. या गडांच्या दगडधोंड्यांत ठासलेला शिवशौर्याचा ठसा द़ृकश्राव्य माध्यमातून जनतेसमोर सादर करता येईल. आंतरराष्ट्रीय पर्यटन डोळ्यासमोर ठेवत मूलभूत पायाभूत सुविधा, दळणवळण यंत्रणा, मुक्काम, गिर्यारोहण, चित्रीकरण आदी सोयी शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर उभारता येतील.

2) शिवसृष्टी व संत दालनांची उभारणी : महाराष्ट्रातील 358 तालुक्यांसह इतर राज्यांच्या राजधानी, काही जागतिक महानगरे अशा 400 ठिकाणी शिवसृष्टी संकल्पनेवरील उद्यानांची किंवा परिसराची उभारणी करावी. या 400 ठिकाणी शिवचरित्रातील प्रसंग, पराक्रमी मावळ्यांचा इतिहास, संत जीवनावर प्रकाश टाकणारे देखावे, दालने व ग्रंथालय उभारणी करावी.

3) शिवशिक्षण प्रसार : शिवजन्म शताब्दी मंत्रालयाने प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात वयोगटानुरूप शिवकालीन इतिहास व त्यातील प्रेरणात्मक मूल्यांची ओळख करून देणारा अनोखा उपक्रम राबवावा. हा अभ्यासक्रम परीक्षा किंवा मार्कांसाठी नको. शिवरायांच्या इतिहासाची मांडणी नव्या पिढीसमोर अभिनव पद्धतीने करण्यासाठी हवा. नाट्य, अ‍ॅनिमेशन, फिल्ममेकिंग इत्यादी परफॉर्मिंग आर्टस्चा त्यात समावेश असावा. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पलीकडे जाणारा संस्कार त्यातून घडावा. पीएच.डी.चीदेखील सोय असावी. महाराष्ट्रातील 358 तालुके आणि इतर 42 विशेष ठिकाणांसह 400 आदर्श शाळा या माध्यमातून निर्माण करता येतील.

4) पाटबंधारे व सिंचन योजना : रयतेच्या भाजीच्या देठाचीही काळजी करणारे विशेष सिंचन व पाटबंधारे प्रकल्प या शिवजन्म शताब्दी मंत्रालयातर्फे राबवले जावेत. त्यातून मिळणार्‍या पाण्याचा प्रत्येक थेंब जास्तीत जास्त शेतकर्‍यांच्या शिवारात पोहोचविता येईल. त्यामध्ये एक किंवा दोन नद्याजोड प्रकल्प, काही कॅनॉल प्रकल्पांसह 400 तळ्यांची निर्मिती, 400 नदीपात्रांतील गाळ उपसणी, बंधार्‍यांची डागडुजी इत्यादी कामे व्हावीत.

5) सामाजिक वनीकरण : पुढील पाच-सहा वर्षांत महाराष्ट्रभर 400 लक्ष म्हणजे चार कोटी वृक्षांचे रोपण व संगोपन करावे. त्या त्या भागातील भौगोलिक व पर्यावरणाच्या परिस्थितीला अनुरूप वेगवेगळ्या जातींची झाडे लावावीत.

6) शेतकरी व शेतीकल्याण : शिवरायांची चतुर्थ जन्मशताब्दी साजरी करताना परंपरिक शेतीला 21 व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. यातून महाराष्ट्राला भेडसावणार्‍या व न शोभणार्‍या शेतकरी आत्महत्यांचा दुर्दैवी प्रश्न सोडवता येईल. त्यासाठी अभूतपूर्व आणि 'आऊट ऑफ बॉक्स' पद्धतीची योजना हाती घेता येईल. यात भौगोलिक, जैविक आणि आर्थिक अशा तीन गटांतील शेतकी बाबींचा विचार करून त्रिस्तरावरील डेटा समूहांचे 24 तास रियलटाईम तुलनात्मक गणक मांडावे. त्यातून महाराष्ट्रात कोणत्या भागात कोणती उत्तम व व्यवहारी पिके घेता येतील त्यांची चाचपणी करावी. अशी पिके शेतकर्‍यांनी घ्यावीत म्हणून योजनांचा मेळ घालणारा प्रकल्प हाती घेता येईल.

7) अवकाश विज्ञान : छत्रपती शिवाजी महाराजांनी जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आपली कीर्ती स्थापित केली. आता चतुर्थ जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'इस्रो'च्या साहाय्याने महाराष्ट्राने स्वतःचा एक उपग्रह अंतराळात सोडावा. या शिवजन्म चतुर्थ शताब्दी उपग्रहाच्या माध्यमातून सर्व शेतकर्‍यांना वरील प्रकल्पासाठी इंटरनेट सुविधा द्यावी. याच माध्यमातून महामार्ग आणि रस्त्यांवरील वाहन संचालकांनाही जोडता येईल. यातून रस्ते अपघातांना आळा घालणारी, रोखणारी नवी पावले उचलता येतील.

8) वैद्यकीय उपचार व पशुवैद्यकीय दवाखाने : राज्यातील 358 तालुक्यांत प्रत्येकी एक आणि विविध महानगरे व दुर्गम भागांत 42 अशा 400 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण करावे. त्यामध्ये टेलिमेडिसीनची सुविधा, शस्त्रक्रिया दालने असावीत. याच धर्तीवर 400 पशुवैद्यकीय चिकित्सालये निर्माण करावीत व ती शिवजन्म चतु:शताब्दी मंत्रालयाने दत्तकरूपात चालवावीत.

9) उद्यमता व कौशल्य व आयडिया इन्क्युबेशन सेंटर : 358 तालुके आणि 42 विशेष अशी राज्यभरात अभिनव, उद्यमशीलतेच्या विकासासाठी स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभी करावीत. एखाद्या संकल्पनेचे रूपांतर कंपनीत करण्यासाठी लागणारी माहिती, त्यासाठीच्या साहाय्यभूत शासन योजनांची माहिती तिथे मिळावी. करविषयक सल्ला, मार्केटिंगसंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण व प्रशिक्षण या केंद्रांतून देण्यात यावे.

10) क्रीडा व खेळ : शिवकालीन पारंपरिक खेळांचे पुनरुत्थान करणे. ज्यात सूरपारंब्या, विटी-दांडू, खो-खो, कबड्डी इत्यादी मैदानी खेळ तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात समाविष्ट असलेल्या इतर खेळांना प्रोत्साहन द्यावे.

11) सोहळ्याचे ब्रँडिंग : शिवाजी महाराजांच्या चतुर्थ जन्मशताब्दी सोहळ्यासाठी 19 फेब्रुवारी 2030 रोजी जगभरात शुभेच्छा संदेश झळकावेत. यात जगभरातील प्रमुख वृत्तपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, मासिकांमध्ये महाराजांची संक्षिप्त माहितीपर जाहिरात असावी. ललित लेख, रील्स यावेत. न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर, बुर्ज खलिफा, बीजिंग, लंडन आणि पॅरिस आदी ठिकाणचे बुकिंग आधीच करावे. शिवाय, महाराजांची अस्सल साधने, पोशाख, वाघनखे, भवानी तलवार हे वर्षभरापूर्वी भारतात फिरवून मुख्य सोहळ्याच्या दिवशी रायगडावर दाखल व्हावेत.

12) केंद्र शासन व इतर राज्य सरकारांची कामे : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत, प्रमुख शहरांत महाराष्ट्र सदन उभारावे. मराठी संस्कृतीच्या देदीप्यमान इतिहासाची नोंद, परंपरा दर्शविणारी दालने उभारावीत. भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती व प्रेरणेला अनुरूप, अशी एक युद्धनौका भारत सरकारने येत्या पाच वर्षांत तयार करावी. संपूर्ण जगात तिचा प्रवास घडवून 400 व्या जयंतीनिमित्त जंजिरा जलदुर्गावर तिच्या प्रवासाची सांगता करता येईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने गनिमी कावा, प्रशासन व शौर्यासाठी प्रसिद्ध असलेली राजांची कीर्ती सर्वदूर प्रसारित करता येईल. भारत सरकारच्या आयआयएम, आयआयटी तसेच मान्यवर विद्यापीठांमध्ये शिवाजी महाराजांच्या नावे चेअर तथा अध्यासन स्थापन करावे. तिथे महाराजांच्या अनेक पैलूंवर पीएच.डी. संशोधन करता येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रबंधन, प्रशासन, नेतृत्व, अर्थशास्त्र, धर्मकारण, कूटनीती, स्थापत्य, कला, नैतिकता, दर्शनशास्त्र इत्यादी विषयांमध्ये भरीव संशोधनात्मक काम करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे जागतिक विद्यापीठांमध्ये जागतिक शिष्यवृत्ती देता येतील. अशा या बारा मुख्य जबाबदार्‍या शिवजन्म चतु:शताब्दी मंत्रालयाने हाती घेतल्या, तर या सोहळ्याचा निम्मा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल.

ब) दुसरा स्तर हा सामाजिक स्तरावरील उपक्रमांचा आहे : विखुरलेल्या समाजमतांना एकत्र बांधणारा रामबाण म्हणजे शिवाजी महाराज! 17 व्या शतकाच्या आधीच्या पिचलेल्या, खचलेल्या आणि विखुरलेल्या मराठी मनांत शिवरायांनीच हुंकार भरला. एकतेचा संदेश दिला. येऊ घातलेली 400 वी शिवजन्म जयंतीदेखील मराठी मनांच्या पुनर्रचनेची, मराठी रेनेसाँसची, पुनरुत्थानांची, बृहद् मराठी अस्मितेची, आधुनिक भारताची चळवळ होऊ शकते. गावोगावी शिवाजी मंडळे पुन्हा ऐक्याचे पोवाडे गाऊ शकतील. राजकारणाच्या दुफळीत विभागलेली मते पुन्हा शिवरायांच्या भगव्या ध्वजाखाली एकवटू शकतील. मात्र, या सामाजिक स्तराचे नेतृत्व बिगरसरकारी आणि बिगरराजकीय असावे लागेल. खेड्यापाड्यांतील शिक्षकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, कलाकारांनी, लेखक-विचारवंत आणि विद्यार्थ्यांनी ही चळवळ हाती घ्यायला हवी.

समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सोशल मीडिया तसेच विविध व्यासपीठांवरून लोकवर्गणीतून छोटे उपक्रम राबवावे लागतील. मराठी साहित्य महामंडळाच्या धर्तीवर सर्व क्षेत्रांतील मान्यवरांना एकत्र करून एक विस्तृत मंच तयार करता येईल. या बिगरराजकीय व बिगरसरकारी मंचाखाली व्याख्यानमालांचे आयोजन करता येईल. दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी एक याप्रमाणे पाच वर्षे म्हणजे 60 पुष्पांची जाहीर व यूट्यूब, टी.व्ही.च्या माध्यमातून प्रसारित होणार्‍या व्याख्यानमालेतून एक मंथन घडवता येईल. शास्त्र, तंत्रज्ञान, कला, व्यापार, राजकारण, इतिहास, जागतिक घडामोडी, सामाजिक विषय, पर्यावरण, आरोग्य, शेती ते अध्यात्मापर्यंतच्या विषयांवर शिवव्याख्यानमालेत ऊहापोह होऊ शकेल. यूट्यूबच्या माध्यमातून हा उपक्रम आर्थिक आघाडीवर स्वावलंबी बनविता येईल. सरकारची सल्लागाराची भूमिका या दुसर्‍या स्तराला उपयुक्त ठरेल.

पुढच्या पिढ्यांसाठी सामाजिक ऐक्याचा, देशप्रेमाचा, बंधुभावाचा आदर्श ठेवायचा, तर या शिवजन्म चतु:शताब्दीच्या आधीच्या पाच वर्षांत जातीला जाते करण्याच्या दिशेने पाऊल टाकावे लागेल. जातिभेद व जातविरहित समाजाच्या रचनेचे उपाय योजावे लागतील. यात आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देताना जातिवाचक आडनावांत बदल करता येतील.

वैचारिक चळवळींचे, पुरोगामित्वाचे नेतृत्व महाराष्ट्राने नेहमीच केले आहे. याच धर्तीवर एका नव्या युगाची, शिवशाहीची, सुराज्य स्थापनेच्या द़ृष्टीने महत्त्वाची अशी सुरुवात या मंचाच्या प्रेरणेतून होऊ शकते. या मंचातर्फे कला-संस्कृतीच्या आघाडीवर विशेष काम करता येईल. जसे की, पुढील पाच वर्षांत सर्व भाषांमध्ये शिवाजी महाराजांवर एखाद्या भव्य चित्रपटाची निर्मिती करता येईल. प्रख्यात दिग्दर्शक, कलावंत, संगीतकारांना एकत्र करून बाहुबली किंवा तत्सम उंचीची ही निर्मिती होऊ शकेल. या मंचातर्फे पोवाड्यांची रील्स स्पर्धा, शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या बारा विषयांवर एक वर्ष निबंध, कविता स्पर्धा घेता येतील. रांगोळी, चित्र, लेख, पुस्तक, गीत स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात.

क) शासन आणि सामाजिक स्तरानंतर येतो तो म्हणजे वैयक्तिक स्तर : 'शिवाजी' हा शब्द जेवढा बाह्य मनाला साद घालणारा आहे, तेवढाच तो अंतर्मनात रुजणारा आहे. उदात्त कार्य प्रेरित करणारा आहे. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात एवढे अवाढव्य कार्य शिवरायांनी केले. ज्याला जसा शिवाजी कळतो, तसा तो समजून घेतो. दरवेळी शिवचरित्र वाचताना, ऐकताना नव्याने शिवरायांचे दर्शन घडते. या अर्थाने शिवाजी हा प्रत्येक मनाचा वैयक्तिक कप्पा आहे. ज्याने त्याने त्या कप्प्यामध्ये साठवलेला शिवबा हा चतु:जन्मशताब्दीनिमित्त न्याहाळून पाहायचा आहे. विचारांतून कृती जन्मते. कृतीमध्ये वारंवारता आली की, ती सवय बनते. ही चांगली सवय कायम राहिली की, त्याचे चरित्र बनते. या जन्मशताब्दी चळवळीच्या अनुषंगाने प्रत्येक मनात शिवहुंकार भरता येईल.

उज्ज्वल अशी चरित्रसंपन्न पिढी घडविता येईल. या चतु:जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीला चळवळीचे बाह्य वातावरण मिळू शकेल. कल्पना करा, प्रत्येक स्थापत्य अभियंत्याने हिरोजी इंदोलकरांची सचोटी घेतली, प्रत्येक सैनिक-पोलिसाने मावळ्याचे शौर्य अंगीकारले, प्रत्येक शेतकर्‍याने शिवकालीन रयतेचे काबाडकष्टांचे वाण घेतले, प्रत्येक कलावंताने कवी भूषणाची लेखणी घेतली, प्रत्येक चिमुकल्यामध्ये सखुबाई, संभाजीराजे घडले, प्रत्येक सरकारी कर्मचार्‍यांत-अधिकार्‍यांत अष्टप्रधान अवतरले, तरुणाईत बाजीप्रभू स्फुरले, प्रत्येक पित्यामध्ये धुरंधर शहाजीराजे अवतरले आणि प्रत्येक मातेने जिजाऊंचा आदर्श घेतला, तर घराघरांत शिवबा दिसू लागतील. या वातावरणात स्वयंप्रेरित 'शिवशपथांचे' व 'शिवसंकल्पांचे बीज' खोलवर रुजवता येऊ शकतील. उत्तम व्यक्ती होण्यासाठी अंतर्मनाची हाक व सत्संगाची साथ लागत असते. प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प सोडला की, आपसूकच तो एक जबाबदार व्यक्ती बनतो. वर्षातून एकदा रक्तदान, अन्नदान, ग्रंथ व वस्त्रदान करेन, वर्षात एक तरी झाड लावेन, रोज व्यायाम, प्राणायाम, योग करेन, थोडासा वेळ चिंतनात घालवेन, जातीपातीच्या विचारांना थारा देणार नाही, माझ्या प्रामाणिक उत्पन्नाच्या 35 टक्के बचत करेन, प्रियजनांना फक्त वृक्ष, ग्रंथ स्वरूपातच भेटवस्तू देईन, नियमित पण डोळसपणे मतदान करेन, 'आधार'वर मतदान करेन, असेही काही शिवसंकल्प असू शकतील.
(या लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत असून ती सरकारची नाहीत.)

शिवप्रेमींसाठी ऑनलाईन व्यासपीठ

शिवरायांची आणखी सहा वर्षांनी येणारी 400 वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी ुुु.ीहर्ळींक्षरूरपींळ400.ळप या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून, 'पुढारी' वृत्तपत्र समूहाच्या सहकार्याने हा उपक्रम पुढे न्यायचा आहे. हे संकेतस्थळ सर्व शिवप्रेमींसाठीचे ऑनलाईन व्यासपीठ ठरू शकेल. या संकेतस्थळावर शिवरायांच्या चतु:जन्मशताब्दी सोहळ्याबद्दल चर्चा करता येईल, कल्पना मांडता येतील आणि या सोहळ्यादरम्यान आयोजित केल्या जाणार्‍या प्रत्येक उपक्रमाची लिंकदेखील असेल. हे संकेतस्थळ 6 जून 2024 रोजी 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शिवप्रेमींच्या सेवेत दाखल होेऊ शकेल. तोपर्यंत शिवप्रेमींनी आपल्या कल्पना ळवशरऽीहर्ळींक्षरूरपींळ400.ळप या ई-मेल आयडीवर जरूर पाठवा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news