कोण बाहुबली आणि कोण कट्टप्पा..? | पुढारी

कोण बाहुबली आणि कोण कट्टप्पा..?

‘बाहुबली को कट्टप्पाने क्यों मारा?’ हा प्रश्‍न गेल्या चारेक वर्षांपासून सतत विचारला जातोय. अर्थात, हा आताचा बाहुबली कोण आणि कट्टप्पा कोण? हे जरा तपासायला हवे. ‘बाहुबली’ या बॉक्स ऑफिसवर प्रचंड लोकप्रिय झालेल्या चित्रपटाची आठवण आताच आली याचं कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एक विधान! ‘राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला,’ असे पटोले म्हणाले आणि पुन्हा एकदा खंजिराची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली. योगायोग असा की, याआधी खंजीर राजकारणात आला, तो नेमका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच संदर्भात.

‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला’ हे वाक्य अनेकदा उच्चारले गेले किंवा वाचले गेले असेल. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा हा खंजीर प्रकट झाला, तो पवारांच्या राष्ट्रवादीच्याच संदर्भात. अर्थात, यावेळी कारण आहे, ते नाना पटोलेंच्या गोंदिया जिल्ह्यातल्या राजकारणाचे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यातला भंडारा-गोंदियामधला राजकीय संघर्ष अनेक वर्षे सुरूच आहे. जिल्हा परिषद ते ग्रामपंचायतीपर्यंत प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यात रस्सीखेच सुरू असते. यावेळी राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतल्या पक्षांचा लिखित करार मोडला आणि भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष तसेच सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. ही दगाबाजी असून, याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? अशी आगपाखड पटोले यांनी केली आहे. पटोले यांनी आघाडीतील तिन्ही पक्षांनी काढलेले पत्रकच पुन्हा एकदा उजेडात आणले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांची अध्यक्षपदे आघाडीमधल्या पक्षांकडे राहतील यासाठी एकमेकांशी स्थानिक स्तरावर चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असे या पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि स्वतः नाना पटोले यांच्या या पत्रकावर सह्या आहेत. गेल्या 30 जानेवारीला काढलेल्या या पत्रकानुसार, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, असे ठरले होते. 30 जानेवारी रोजी याबाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यानुसार जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्कात होतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवून ऐनवेळी भाजपसोबत या जिल्ह्यांमधील पंचायत समित्या आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. त्यांनी भाजपसोबत जायचे आहे हे अगोदरच सांगितले असते तर आम्हाला काही अडचण नव्हती. मात्र, आम्हाला अंधारात ठेवून भाजपसोबत हातमिळवणी केली, हेच पाठीत खंजीर खुपसणे आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने नेहमीच आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही पाठीमागून वार करत नाही. गेली अडीच वर्षे सत्तेत सोबत राहून राष्ट्रवादीने आम्हाला कशी वागणूक दिली याची अनेक उदाहरणे देऊन आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे पटोलेंनी सांगितले. दगाफटका खपवून घेणार नाही. आम्ही सत्तेसाठी कधीही लांगुलचालन केले नाही. त्याचे जे परिणाम होतील, त्याची चिंता करायला काँग्रेस पक्ष सक्षम आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

भंडारा, गोंदिया किंवा भिवंडी अशा अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने मैत्रीपूर्ण संबंध असतानाही काँग्रेसच्या विरोधात उमेदवारदेखील उभे केले होते. राष्ट्रवादीला काँग्रेसची सोबत नको असेल तर तसे स्पष्टपणे सांगावे. तशीही राष्ट्रवादीने आधीही भाजपशी सोबत केलेली आहेच. पहाटेच्या वेळी त्यांनी शपथविधीही केला होता, याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी लक्ष वेधले आहे. पटोलेंच्या या हल्ल्यानंतर त्यांना काँग्रेसचे विदर्भातले नेते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही साथ दिली, यावरून त्या पक्षातल्या अस्वस्थतेची कल्पना येते.
नाना पटोलेंच्या या आरोपांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, काँग्रेसनेही आपल्या पक्षाचे काही कार्यकर्ते फोडले असल्याकडे लक्ष वेधले आहे. काही असो, पण काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा हा आरोप अगदी 42 वर्षांपासून शरद पवारांची पाठ सोडायला तयार नाही.

1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडून ‘पुलोद’ची स्थापना केली आणि मुख्यमंत्रिपद मिळवले होते. ‘शरदने माझ्या पाठीत खंजीर खुपसला,’ असे उद‍्गार वसंतदादांनी काढल्याचे म्हटले जाते. तेव्हापासूनच आजवर या खंजिराने पवारांची पाठ सोडलेली नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आणि प्रमोद महाजनांपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत शरद पवारांच्या विरोधात असलेल्या अनेक नेत्यांनीही ‘शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला,’ असाच आरोप केला आहे.

तीन वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा अचानक शपथविधी झाला, तेव्हाच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना देशात विश्‍वासघातकी राजकारणाला शरद पवार यांनीच सुरुवात केली. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचे चांगले चाललेले सरकार पाडणार्‍या शरद पवार यांना आज पाठीत खंजीर खुपसणे काय असते, हे चांगले कळाले असेल, असे बोचरे वक्‍तव्य माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केले होते.
आता पुन्हा एकदा हा खंजीर राष्ट्रवादीच्या पाठीशी लागला आहे. काँग्रेसने पलटवार केला आहे. आघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

– उदय तानपाठक

Back to top button