ई-वाहने : विद्युत वाहनांचा ‘ज्वलंत’ प्रश्न | पुढारी

ई-वाहने : विद्युत वाहनांचा ‘ज्वलंत’ प्रश्न

देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या बातम्या वारंवार ऐकायला मिळणे चिंताजनक आहे. ई-वाहने भारतीय वातावरणात टिकतील अशी असायला हवीत.

देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या बातम्या वारंवार येऊ लागल्या असून, हे अत्यंत चिंताजनक आहे. ई-वाहनांमध्ये आग लागल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यूही झाला आहे. अशा अनेक घटनांनंतर रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच इलेक्ट्रिक वाहनांना गुणवत्ताविषयक मार्गदर्शक नियमावलीही लवकरच जाहीर करण्याची तयारी दर्शविली आहे. ओला या नामांकित वाहतूक कंपनीने आपल्या 1400 ई-स्कूटर्स परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या इंधन महागाईच्या काळात हा मोठा झटका मानला जात असून, पर्यायी इंधनाच्या वाटचालीलासुद्धा तो मोठा धक्का मानला जातो.

भूगर्भातून निघणार्‍या कच्च्या तेलाच्या मदतीने पेट्रोल-डिझेलची निर्मिती केली जाते. जगभरातील बहुतांश वाहने याच इंधनावर अवलंबून आहेत. तथापि, पृथ्वीच्या पोटातील इंधनाचे साठे लवकरच संपणार आहेत, असे सांगितले जाते. त्यामुळे विकासाची घोडदौड कायम ठेवायची असेल, तर पर्यायी इंधनाचा वापर करून चालणारी वाहने हाच उत्तम पर्याय आहे. पेट्रोल-डिझेल मिळणे काही वर्षांनंतर बंद होईल, हे गृहित धरून अनेक देशांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. ई-वाहनांचा दुसरा फायदा म्हणजे प्रदूषणापासून मुक्तता. त्यामुळे त्या द़ृष्टिकोनातूनही इलेक्ट्रिक वाहनांना महत्त्व दिले जात आहे. भारताच्या अनेक राज्यांमधील सरकारे तर अशा वाहनांसाठी अनुदानही देतात.

या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित या नव्या समस्येने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. वाहनांना आग लागण्याच्या सर्वाधिक दुर्घटना वाहनाचे चार्जिंग सुरू असताना घडल्या आहेत. स्कूटरमध्ये वापरली जाणारी बॅटरी ही केवळ एकच बॅटरी नसते. वास्तविक, तो शेकडो बॅटरींचा संच असतो. या शेकडो बॅटरी एकत्रितपणे पॅक केलेल्या असतात. त्यामुळेच त्याला ‘बॅटरी पॅक’ असे म्हटले जाते. जो बॅटरी पॅक ई-स्कूटरमध्ये वापरला जातो, तो पॅक भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशांसाठी योग्य आहे की नाही, हा मुख्य मुद्दा आहे. ई-स्कूटर पेटण्याच्या अनेक घटना उन्हाळ्यातच घडल्या आहेत, हे महत्त्वाचे असून यंदाचा उन्हाळा तीव्र आहे, हेही सर्वजण जाणतात. लिथियमची बॅटरी थंड हवामानात चांगले काम करते, असे सामान्यतः म्हटले जाते. त्याचप्रमाणे उच्च तापमान असणार्‍या भागांमध्ये काम करताना लिथियम बॅटरी पॅक गरम होऊ शकतो, असे सांगितले जाते. हे तापमान वाढून 90 ते 100 अंश सेल्सिअसपर्यंतही जाऊ शकते आणि त्यामुळे वाहनाला आग लागण्याचा धोका संभवतो.

जाणकार असेही सांगतात की, लिथियम आयन बॅटरीमध्ये आग लागलीच तर त्यावर नियंत्रण ठेवणे खूपच अवघड असते. कारण, ही बॅटरी अत्यंत वेगाने तसेच उच्च तापमानासह जळते. यावरून असाही एक प्रश्न निर्माण होतो की, भारतात वापरण्यात येणारे बॅटरी पॅक भारतातील जलवायू परिस्थितीशी अनुकूल नाहीत का? आणखीही एक प्रश्न असा निर्माण होतो की, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याच्या द़ृष्टीने ई-वाहने बाजारपेठेत मोठ्या संख्येने उतरवून शाबासकी मिळवताना या वाहनांची भारतीय हवामानात चाचणी न घेताच ती आणली गेली का? ई-वाहने ही आजच्या काळाची गरज आहे, याबाबत दुमत असता कामा नये. परंतु, ही वाहने व्यवस्थित चाचण्या घेऊन, भारतीय हवामानासाठी ती योग्य आहेत याची खातरजमा करून बाजारात उतरविली गेली पाहिजेत, हेही तितकेच खरे. त्याचप्रमाणे या वाहनांचे चार्जिंग करताना कोणकोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे, याबाबत स्पष्ट निर्देश जारी करण्याची गरज आहे आणि वाहनधारकांनीही त्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेही आवश्यक आहे. ई-वाहन निर्मात्यांनी कोणतेही वाहन यापुढे चाचण्या घेतल्याखेरीज बाजारात उतरवू नये, एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यास हरकत नसावी.

– राजीव मुळ्ये

Back to top button