एबीजी शिपयार्ड-बँक घोटाळ्यात ईडीचे छापे | पुढारी

एबीजी शिपयार्ड-बँक घोटाळ्यात ईडीचे छापे

नवी दिल्ली/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वांत मोठा बँक घोटाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या एबीजी शिपयार्ड-बँक घोटाळ्याप्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबई, पुणे व सुरतमध्ये छापे टाकले. मुंबईत 24 ठिकाणी, तर पुणे आणि सुरत येथे प्रत्येकी एका ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.

एबीजी शिपयार्ड लि. कंपनी आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अगरवाल आणि अन्य काही जणांनी बँकांच्या समूहाची 22 हजार 842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सीबीआयने दाखल केला होता. या प्रकरणात एबीजी शिपयार्डचा तत्कालीन कार्यकारी संचालक संतानम मुथास्वामी, संचालक अश्‍विनीकुमार, सुशीलकुमार अगरवाल, रवी विमल नेवतिया आणि एबीजी इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीवर भारतीय दंड विधान तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांखाली गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्‍वासघात व अधिकारांचा गैरवापर आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आरोपींनी 98 बोगस कंपन्या सुरू करून मोठ्या प्रमाणात हवालामार्गे निधी वळवला आणि या पैशाचा वापर व्यक्‍तिगत मालमत्तांची खरेदी तसेच कर्जाची फेरजुळणी करण्यासाठी केल्याचा आरोप आहे. त्यासाठी एबीजी शिपयार्ड कंपनीने संबंधितांकडे हजारो कोटी रुपये हस्तांतरित केले, तसेच बँक कर्जांची रक्‍कम वळवून परदेशांतील उपकंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. हा सर्व घोटाळा 2005 ते 2012 या काळात झाल्याची माहिती सीबीआयने यापूर्वी दिली होती. या कंपनीने 28 बँकांकडून प्रामुख्याने तीन प्रकारची कर्जे घेतली होती.

कंपनीच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकार्‍यांसह संबंधित लोकांचा घोटाळ्यातील सहभागही तपासला जात आहे. एबीजी शिपयार्ड-बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे.

2005 ते 2012 या कालावधीत एबीजी शिपयार्डने कर्ज उचलून तो पैसा विदेशातील कंपन्यांमध्ये फिरवला होता. नंतर या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रिशी अगरवाल याच्याविरोधात गेल्या फेबु्रवारी महिन्यात सीबीआयने लूकआऊट नोटीस जारी केली होती.

Back to top button