महाड : अखेर जुना सावित्री पूल पाडण्याच्या कामास सुरूवात | पुढारी

महाड : अखेर जुना सावित्री पूल पाडण्याच्या कामास सुरूवात

महाड : पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगल वाडीजवळील सावित्री नदीवरील जुना पूल पाडण्याच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. पुणे येथील शिंदे कंपनीला हे काम १ कोटी १२ लाखांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आले आहे. या कामाकरिता तीन महिन्यांची मुदत देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या सूत्रांनी दिली. जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापूरासाठी कारणीभूत असलेल्या विविध घटनांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्यात आला होता. यात हा पूल महापूरासाठी कारणीभूत असल्याचे समोर आले होते.

या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग म्हाडाच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जुन्या सावित्री पुलालगत असलेल्या बांधकाम पाडण्यास सुरुवात केली होती. मात्र, काल सायंकाळपासून पुल पाडण्याच्या प्रत्यक्ष कामास शिंदे कन्स्ट्रक्शन्स कंपनीने सुरूवात केली आहे. जुलै २०२१ मध्ये आलेल्या महाप्रलयानंतर हा जुना पूल काढून टाकण्याची मागणी महाड औद्योगिक वसाहतीमधील उत्पादक संघटना आणि महाडकर नागरिकांकडून करण्यात आली होती. या संदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या लोणेरे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पोरे यांच्या अहवालाच्या प्राप्तीनंतर हा पुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, महाड पूर निवारण समिती व औद्योगिक वसाहतीमधील उत्पादक संघटनेने या संदर्भात पंधरा दिवसांपूर्वी नागलवाडी फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. यादरम्यान महाड येथे आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्यक्ष दिलेल्या भेटीनंतर हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती.

घेत करण्यात आलेल्या विविध मागण्यांपैकी ही प्रमुख मागणी पूर्णत्वास जात असल्याबद्दल महाड औद्योगिक वसाहतीमधील उत्पादक संघटना परिसरातील नागरिक तसेच पूर निवारण समितीने शासनाला धन्यवाद दिले आहेत .

हेही वाचलंत का ? 

Back to top button