

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : पंढरपुरातील रुक्मिणी मातेच्या चरणावरचा वज्रलेप अवघ्या वर्ष-दीड वर्षांत निघू लागला आहे. यामुळे पुरातत्त्व विभागाचे पथक याची पाहणी करून उपाययोजनेसाठी येत्या 25 व 26 एप्रिल रोजी मंदिराला भेट देणार आहे. यासंदर्भात मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानुसार पथक पाहणी करून उपाययोजना करणार आहे.
पुरातन श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला होता. परंतु, कोरोनाकाळात दोन वर्षे पदस्पर्श दर्शन बंद असतानाही मूर्तींचा वज्रलेप निघू लागल्याचे दिसून आले होते. यासंदर्भात 2 एप्रिल रोजी हा प्रकार चव्हाट्यावर येताच भाविकांतून नाराजीचा सूर उमटला होता. याची तत्काळ दखल घेऊन उपाययोजना व निर्णय घेण्यासाठी मंदिर समिती व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्यात गुरुवार (दि. 14) बैठक झाली. या झालेल्या ऑनलाईन बैठकीत रुक्मिणी मातेच्या चरणावर पूर्वीप्रमाणेच वज्रलेप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 5 मे पर्यंत पुरातत्त्व विभागाने करावयाच्या उपाययोजनेबाबत अहवाल पाठवावा, अशा सूचना दिलेल्या आहेत.
दरम्यान, रुक्मिणी मातेच्या चरणावरची होणारी झीज लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पुरातत्त्व विभागाला पत्रव्यवहार करून पंढरपूरला येऊन मंदिरातील मूर्तीची
पाहणी करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार पुरातत्व विभाग येत्या 25 व 26 एप्रिल रोजी मंदिराला भेट देण्यासाठी येणार आहेत. रुक्मिणी मातेची मुर्ती ही गंडकी पाषाण म्हणजेच शाळीग्राम दगडाची असून ती गुळगुळीत आहे. मात्र या मूर्तीच्या पायाची झिज होत असल्याने पायावर वज्रलेप केला जातो. वज्रलेपाचे कशामुळे तुकडे पडले आहेत, हे पुरातत्व विभाग शोधणार आहे.
वज्रलेपास त्याचबरोबर मुर्तीस कशामुळे हानी पोहचते, त्या कारणांचाही पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी करून शोध घेणार आहेत. त्यावर उपाययोजना देखील ते सूचविणार आहेत. त्यांनी सूचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी मंदिर समितीला करावी लागणार आहे.