तुळजाभवानी देवीस द्राक्षांची आरास | पुढारी

तुळजाभवानी देवीस द्राक्षांची आरास

तुळजापूर  ; पुढारी वृत्तसेवा : चैत्री यात्रेच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर ओसंडून वाहत आहे. हजारो भाविकांनी ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’ अशा जयघोषात दर्शन घेतले. अहमदनगर येथील भक्त शिवाजी शिंदे यांनी द्राक्ष अर्पण केल्याने गाभार्‍यात द्राक्षांची आरास करण्यात आली होती.

चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने भरलेल्या तुळजाभवानी देवीच्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दोन दिवसांपासून सुरू आहे. जलदगतीने हजारो भाविकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून अनेक नवीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दोन दिवसांत समोर आले आहेत.

केवळ एक तास 20 मिनिटे एवढ्या वेळेमध्ये दर्शनाच्या रांगेमधून भाविकांना दर्शन दिले जात आहे. याशिवाय सशुल्क दर्शनासाठीदेखील भाविकांची गर्दी दिसून येत आहे. जवळपास लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज मंदिर समितीच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

राजे शहाजी महाद्वार येथून भाविकांना दर्शन झाल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग केल्यामुळे येथील व्यापारी वर्गांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापूर्वी बाहेर पडण्याचे मार्ग बदल केल्यामुळे व्यापार्‍यांमध्ये नाराजी होती. परंतु चैत्री यात्रेच्या निमित्ताने ही नाराजी दूर झाल्याचे चित्र आहे. दर्शना रांग घाटशिळ रोड, कार पार्किंगमार्गे कुंभार गल्लीमधून दर्शनमंडप अशा चालविण्यात येत आहेत.

दर्शन मंडपातून दर्शन घेऊन बाहेर पडणार्‍या राजे शहाजी महाद्वारातून बाहेर काढले जात आहे. तुळजाभवानीची सकाळची अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर अहमदनगर येथील शिवाजी शिंदे यांनी भवानी मातेस आपल्या द्राक्ष बागेमधील पहिले पीक देवीच्या चरणी केल्याने संपूर्ण भवानी मातेचे चांदीचे सिंहासन आणि देवीचा गाभारा सजविण्यात आला होता. हे आगळेवेगळे दर्शन भाविकांना या निमित्ताने घेता आले.

त्यांच्यासमवेत कैलास पेठकर (रा. पुणे), सूरज परदेशी (रा. पुणे), प्रताप परदेशी (रा. पुणे) यांची उपस्थिती होती. त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्यावतीने व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी सत्कार केला. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे, विश्वास कदम, विश्वास सातपुते, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे उपस्थित होते.

Back to top button