रायगड : पत्नीच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्‍या पतीची पोलीस ठाण्यात आत्महत्या | पुढारी

रायगड : पत्नीच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्‍या पतीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

रोहा : पुढारी वृत्तसेवा : पत्नीचा खून प्रकरणी अटकेत असलेल्‍या पतीने पाेलीस ठाण्‍यात आत्‍महत्‍या केली. रवी वसंत वाघमारे ( ता. राेहा, शेणवई, आदिवासी वाडी ) असे त्‍याचे नाव आहे. रोहा पोलिसांनी ११ एप्रिल रोजी त्याला अटक केली होती. आज ( गुरुवार) पहाटे राेहा पोलीस ठाण्यातील कोठडीत त्‍याने  आत्महत्या केल्‍याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्‍यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी रोहयात दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, जेवण तयार करण्‍यावरुन ९ एप्रिल रोजी रवी वाघमारे याचे आपल्या पत्नीशी भांडण झाले. त्‍याने लोखंडी कोयत्याने वार करून पत्नी जयश्री वाघमारे हिचा खून केला. रोहा पोलिसांनी त्‍याला अटक केली. रवी वाघमारेला न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी पहाटे त्‍याने  कोठडीमधील पांघरुणासाठी दिलेल्या चादरीची किनार फाडून कोठडी मधील शौचालयात गळफास लावून घेवून आत्महत्या केली.

रोहा पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून माहिती घेण्याचे काम सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय, मानवाधिकार आयोग यांचे निर्देशानुसार या घटनेचा पंचनामा व पुढील तपास करण्यात येणार आहे. कायद्यानुसार निष्पक्ष व पारदर्शक तपास करणार आहे. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

अशाेक दुधे, पाेलीस अधीक्षक

या घटनेतील दांपत्यास चार अपत्ये असून १० ते दीड वर्षे वयोगटातील आहेत. तसेच त्यांचे पालनपोषण करण्यास मृत महिलेच्या वयोवृद्ध आई वडिलांशिवाय अन्य कोणीही नाही. स्थानिकांनी याची जाणीव प्रशासनास करुन दिली असता प्रशासनाने याची दखल घेत या अनाथ व निराधारांना आवश्यक ती मदत देण्यासंबंधी कारवाई सुरु केली आहे.

– कविता जाधव, तहसीलदार, रोहा

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button