"आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा. नंतर अखंड भारत करा", राऊतांचा भागवतांना टोला | पुढारी

"आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा. नंतर अखंड भारत करा", राऊतांचा भागवतांना टोला

पुढारी ऑनलाईन डेक्स : पुढील १५ वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण होईल. त्या वाटेत जो कोणी येईल तो संपला जाईल, असे विधान आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले हाेते. या विधानाचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.  “पहिल्यांदा पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या. अखंड भारताला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही. हा देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

माध्‍यमांशी बाेलताना संजय राऊत म्हणाले की, “आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. पण, देशातील न्यायव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली आहे. रामनवमीच्या दिवशी विविध राज्यांमध्ये दंगली घडल्या.” तसेच विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की, ” विक्रांत बचाव निधी प्रकरणात पैशांचा अपहार झाला आहे. त्यातील आरोपी निर्दोष नाहीत. विशिष्ट पक्षांच्या लोकांनांच अटकेपासून संरक्षण मिळते आहे. पण, महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही”, असा सवालही त्‍यांनी केला.

मोहन भागवत काय म्हणाले? 

राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे (RSS) सर संघचालक मोहन भागवत म्हणाले की, “सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र आहे. १५ वर्षांत पुन्हा अखंड भारत तयार होईल. हे सगळं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहणार आहात. तसे पाहिले तर संत आणि ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे २०-२५ वर्षांत भारत पुन्हा अखंड होणारच आहे. जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गती वाढवली तर १०-१५ वर्षांतच अखंड भारत निर्माण होईल”, असे मत मोहन भागवतांनी मांडलेले आहे.

मोहन भागवत म्हणाले की, “आमची राष्ट्रीयता गंगेप्रमाणे वाहते आहे. जोपर्यंत राष्ट्र आहे, तोपर्यंत धर्म आहे. १ हजार वर्षे सनातन धर्म संपविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण, तो संपला नाही. तो आजही आहे. भारत असा एकमेव देश आहे, जिथं जगातला कोणताही व्यक्ती आला तर त्याच्यातील दृष्ट प्रवृती नष्ट होते. ही व्यक्ती भारतात आली की, सुधारते आणि नंतर मिटते. तथाकथित लोक सनातन धर्माला विरोध करतात, त्यांचाही यामध्ये सहभाग आहे. त्यांनी विरोध केला नाही तर हिंदू जागृतच होत नाही.

हे वाचलंत का? 

Back to top button