महत्त्वाची बातमी ! ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात होणार फेरबदल ? | पुढारी

महत्त्वाची बातमी ! ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात होणार फेरबदल ?

मुंबई, पुढारी ऑनलाईन : महाविकास आघाडीमध्ये धुसपूस असल्याचे मागील दिवसांपासून समोर आले आहे. शिवसेना गृहमंत्र्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशानातही झाला नाही, त्यामुळे काॅंग्रेस नाराज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. त्यात मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या निर्यणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील खातेबदलही होण्याची शक्यता बोलली जात आहे. यामध्ये गृहखातं शिवसेनेने घ्यावं, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात गृहखात्याची अदलाबदली होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेले आहे.

८ एप्रिलला महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक होणार असून त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित असणार आहेत. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून २ अधिवेशन झाली तरीही अध्यक्षपदाची निवड झाली नाही, त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेचे नेते भास्कर जाधव चांगल्या प्रकारे संभाळू शकतात, असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे. पण, हे अध्यक्षपद काॅंग्रेसच्या नेत्याला मिळायला हवं असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले गेले, मात्र मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त फेटाळून लावले.

काॅंग्रेसच्या आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याचे वारंवार माध्यमांसमोर दिसून आलेले आहे. शिवसेना आणि काॅंग्रेस यांच्या आमदारांना निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ८ एप्रिलची महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक फार महत्वाची ठरणार आहे.

हे वाचलंत का?

Back to top button