14 वर्षे सुनावणीच नाही, बलात्कार प्रकरणात भोगला 21 वर्षे कारावास, सुनावणीनंतर निर्दोष सुटकेचे आदेश

14 वर्षे सुनावणीच नाही, बलात्कार प्रकरणात भोगला 21 वर्षे कारावास, सुनावणीनंतर निर्दोष सुटकेचे आदेश

अलाहाबाद; वृत्तसंस्था :  बलात्काराच्या आरोपात 21 वर्षे शिक्षा भोगणार्‍या कैद्याचे अपील 2008 नंतर कधीच सुनावणीला आले नाही. आता या आठवड्यात ते आले आणि सबळ पुराव्यांअभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

न्या. कौशल ठक्कर आणि न्या. अजय त्यागी यांनी हा निर्णय देताना खालच्या न्यायालयाच्या निर्णयावर नापसंती व्यक्त करीत तुरुंग प्रशासनावरही कोरडे ओढले आहेत. आफताब नावाच्या व्यक्तीला एका बलात्कार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. भारतीय दंडसंहितेच्या 376 आणि 'एससीएसी' कायद्याच्या कलम 3(2) अन्वये 2003 साली त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. त्याने 2004 मध्ये या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले. हे प्रकरण 2008 मध्ये प्रथम सुनावणीला आले. त्यानंतर 2022 पर्यंत त्याची सुनावणीच झाली नाही. नुकतेच हे प्रकरण उच्च न्यायालयासमोर आल्यावर न्यायमूर्तींनी त्याची सुनावणी घेताना गंभीर प्रकार उघडकीला आला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, 14 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर आरोपीला मुक्त करण्याचा तुरुंग प्रशासनाने विचार करायला हवा होता. न्यायालयाचे आदेश नसले, तरीही दंडसंहितेच्या 433 कलमानुसार त्याच्या मुक्ततेबाबत विचार करणे बंधनकारक आहे; पण प्रशासनाने तेही केलेले नाही, असे खंडपीठाने सुनावले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news