ठाणे महानगरपालिका हद्दीतील १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश होणार

ठाणे महानगरपालिका हद्दीतील १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश होणार
Published on
Updated on

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महानगरपालिका लगतच्या १४ गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करायला नगरविकास विभागाने मंजुरी दिली. तशी घोषणाच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२४) विधानसभेत केली. ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे गावांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा सुनियोजितपणे विकास करणे शक्य होणार आहे.

१४ गावांचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होता. याबाबत अनेकदा सदनात प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र प्रत्येकवेळी शासन सकारात्मक असल्याचे सांगून पूढे काहीच ठोस घडत नव्हते. चालू अधिवेशनात पुन्हा एकदा १४ गावांचा समावेशाचा प्रश्न आमदार प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला होता.

ठाणे महानगरपालिका : १४ गावांचे आंदोलन अयशस्वी

ठाणे महानगरपालिका लगत असलेली १४ गावे ही आधी नवी मुंबई महानगरपालिकेतच होती. मात्र त्यावेळी गावकऱ्यांनी आंदोलने केल्यामुळे ती नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यामुळे या गावांमध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांच्या अडचणी निर्माण झाल्या.

या अडचणी दूर करून त्यांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या या मागणीसाठी ही गावे पून्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेता ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करायला नगरविकास विभाग सकारात्मक असल्याचे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मात्र सद्यस्थितीत निवडणुकांची प्रभागरचना निश्चित झाली असून, सद्यस्थितीत प्रभागरचना पूर्ण झालेल्या कोणत्याही प्रभागाची हद्द निश्चित करण्यास मर्यादा येत असल्याने येत्या काही दिवसात ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करू असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र एवढ्याने समाधान न झाल्याने आजच्या आज ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची आग्रही मागणी करण्यात आल्याने मंत्री शिंदे यांनी तशी घोषणा विधानसभेत केली.

१४ गावातील भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला असून याबाबत कायमच सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गावांना नवी मुंबईत समावेश केल्यानंतर त्यांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिकता ठरवून टप्याटप्याने निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे देखील मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

तसेच हा निर्णय जाहीर केला असला तरीही १४ गावांसंदर्भात सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून त्यांचे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नवी मुंबई आयुक्तांना दिले असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

या १४गावांचा नवी मुंबईत होणार समावेश

यात, निगु, मोकाशी, पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे, दहिसर मोरी अशा 14 गावांचा यात समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news