पिंपरी : घर भाड्याने देताय… सावधान ! सायबर चोरट्यांनी घातला 114 घरमालकांना गंडा

पिंपरी : घर भाड्याने देताय… सावधान ! सायबर चोरट्यांनी घातला 114 घरमालकांना गंडा
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी : घर भाड्याने देण्यासाठी जर तुम्ही सोशल मीडियावर जाहिरात केली असेल, तर जरा खबरदारी घ्या… कारण ती जाहिरात पाहून सायबर चोरटादेखील तुमच्याशी संपर्क करू शकतो. पिंपरी चिंचवडमध्ये चालू वर्षात सायबर चोरट्यांनी तब्बल 114 घरमालकांना गंडा घातल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे घर भाड्याने देताना खबरदारी घेण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लष्करात असल्याची बतावणी
सायबर चोरटे घरमालकाला फोनवर आपण भारतीय लष्करी सेवेत असल्याचे सांगतात. घरमालकाचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर बनावट ओळखपत्रदेखील पाठवले जाते. एकदा विश्वास संपादन झाला की, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्यासाठी भाग पाडून फसवणूक केली जाते.

अशी केली जाते फसवणूक
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली जाहिरात पाहून सायबर चोरटे घरमालकाला फोन करतात. आपल्याला घर भाड्याने हवे आहे, असे सांगून घरमालकांकडून आणखी तपशील मागवून घेतात. त्यानंतर बुकिंग अमाउंट ऑनलाइन पाठवतो, असा मेसेज करून घरमालकाला पैसे आले का, अशी वारंवार विचारणा केली जाते. थोड्याच वेळात काही तांत्रिक अडचण आल्याचे सांगून पैसे जात नसल्याचे सांगितले जाते, त्यानंतर घरमालकाच्या मोबाईलवर क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास भाग पाडले जाते. घरमालकांनी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर काही वेळातच घरमालकाच्या बँक खात्यावरून आपोआप दुसर्‍या बँक खात्यावर पैसे हस्तांतरित होतात.

घटना…

केतन अरलकर (रा. भूमकर चौक, वाकड) यांनी फ्लॅट भाड्याने देण्यासाठी 99 एकर्स या वेबसाईटवर जाहिरात दिली. त्यानंतर सायबर चोरट्याने संपर्क साधून त्यांना फ्लॅट पसंत असल्याचे सांगितले. तसेच, चोरट्याने त्यांना एक क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास भाग पाडले. त्यानुसार, तक्रारदार केतन यांनी क्यूआर कोड स्कॅन केला असता त्यांच्या बँक खात्यातील एक लाख 80 हजार रुपये परस्पर दुसर्‍या बँक खात्यावर हस्तांतरित झाले. अचानक बँक खात्यावरील पैसे कमी झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केतन यांनी पोलिसात
धाव घेतली.

अशी घ्या काळजी…
सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यानुसार कोणतीही कृती करू नका.
अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर पाठवलेली लिंक, क्यूआर कोड ओपन करू नका.
आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घ्या ज्यामुळे परदेशात बसून रॅकेट चालवणार्‍या चोरट्यांना तुमची फसवणूक करणे शक्य होणार नाही.
ओटीपी शेअर करू नका. ओटीपी हा तुमच्या व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी दिला जातो. तुम्ही ओटीपी शेअर केल्यास बँक किंवा पोलिसदेखील तुमची मदत करू शकणार नाहीत.
ओटीपीप्रमाणेच कार्डवरील र्लीर्ींं नंबर कोणालाही देऊ नये.
फोनवर बोलणारा अनोळखी व्यक्ती खूप गडबडीत असल्याचे भासवत असल्यास सतर्क व्हा.

घर भाड्याने देण्यासाठी केलेली जाहिरात पाहून चोरटे घरमालकांना फसवू लागले आहेत. त्यासाठी ते क्यूआर कोडचा वापर करतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींनी पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करू नये. शक्यतो समोर भेटूनच आर्थिक व्यवहार करावेत.

                                                    – डॉ. संजय तुंगार, सायबर सेल, पिंपरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news