उद्या महाड बंदची हाक | पुढारी

उद्या महाड बंदची हाक

महाड ; प्रतिनिधी : महाड पूर निवारणासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून आदेश देऊनही प्रशासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या जाणीवपूर्वक दिरंगाई विरोधात आज महाडकर नागरिकांनी पूर्ण बंद पाळण्याचा निर्णय वीरेश्वर सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये घेतला आहे .

मागील वर्षी बावीस आणि तेवीस जुलै रोजी आलेल्या महाप्रलयानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शासनाकडून निर्धारित केलेल्या सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्यास आलेल्या अपुऱ्या यंत्रणेच्या विरोधात वीरेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये बैठक झाली. या झालेल्या बैठकीत महाडमधील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, महाडकर नागरीक व पूर निवारण समितीच्या सदस्यांमध्ये सुमारे एक तासाच्या चर्चा झाली. या चर्चेनुसार शुक्रवारी सकाळी दहा वाजता गांधारी नाका येथून प्रांत कचेरीवर मोर्चा नेण्यात येणार आहे. बैठकीमध्ये महाड पूर निवारणासंदर्भात तातडीने यंत्रणा पाठविण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हा बंद सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला .

गेल्या दोन दिवसांपासून महाड पूर निवारण समितीच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये कॉर्नर सभा घेण्यात येत असून नागरिकांमधे भविष्यातील येणाऱ्या अडचणींसंदर्भात जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. या चौकसभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज सायंकाळी महाडमधील उर्वरित सर्व विभागांमध्ये चौकसभा पूर्ण होतील .

चिपळूणच्या तुलनेत पहाड येथे असलेली यंत्रणा ही अपुरी असून आगामी शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये सावित्री नदी पात्रातील गाळ काढणे निव्वळ अशक्य असल्याने शासनाने याठिकाणी त्वरित सुसज्ज यंत्रणा पाठवावी अशी महाडकर नागरिकांची मागणी आहे. सदरची मागणी मंजूर न झाल्यास चार दिवसांपूर्वी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

Back to top button