Arogya Vibhag Bharti : आरोग्य विभागात 11 हजार पदे भरणार : आरोग्यमंत्री तानाजी सावंत

Arogya Vibhag Bharti : आरोग्य विभागात 11 हजार पदे भरणार : आरोग्यमंत्री तानाजी सावंत
Published on
Updated on
गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी मतदारसंघात आ. प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या चौदा कलमी मागण्यांची पूर्तता लोकसभा निवडणुकीपूर्वी करणार असून, आरोग्य विभागात 11 हजार पदांची लवकरच भरती करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली. ते येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. खा. संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते. आ. प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.
ना. सावंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकारने महाराष्ट्राच्या व सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय घेतले असून, त्याचे द़ृश्य परिणाम  दिसू लागले आहेत. गेली कित्येक वर्षे आरोग्य खात्याला वार्‍यावर सोडले आहे. तीन महिन्यांत बिंदू नामावली तयार करणार आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या असून, त्याचा निकाल पंधरा दिवसांत येईल.  आरोग्य विभाग हायटेक करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रत्येक तालुक्याला फिरता दवाखाना सुरू करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
खा. मंडलिक म्हणाले, आरोग्य विभागाचे काम कात टाकल्यासारखे सुरू आहे. आ. आबिटकर यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीस कार्पोरेट लूक मिळाला आहे. अशीच वास्तू मुरगूड येथे उभारणार आहे.
आ. आबिटकर यांनी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयासारखी आरोग्य सेवा गारगोटीत मिळावी, डायलेसीस युनिट सुरू करावे, कसबा तारळे, आजरा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत, दाजीपूर, तुरंबे, म्हासुर्ली, मडूर येथे स्टाफ मिळावा, कडगाव, सोळांकूर येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी केली.
ना. तानाजी सावंत यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला. कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ. मिलिंद कदम यांचा, शाखा अभियंता राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला, तर नाथाजी पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन केले.
प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, तहसीलदार अश्विनी आडसूळ, जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक मिलिंद कदम, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, बी. एस. देसाई, के. जी. नांदेकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, प्राचार्य अर्जुन आबिटकर, कल्याण निकम, नाथाजी पाटील, सागर शिंदे, संग्राम सावंत, विद्याधर परीट आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते.
केवळ 11 महिन्यांत कारखाना उभा करू
आ. आबिटकर स्वकर्तृत्वाने पुढे आले असून, त्यांनी साखर कारखान्यासाठी जागा सुचवावी. 11 महिन्यांत कारखाना उभा करू, अशी घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटात ना. सावंत यांच्या घोषणेचे स्वागत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news