नाशिक; पुढारी वृत्तसेवा : दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, मंडळाकडून अद्याप याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही.
दहावी-बारावीचा निकाल वेळेवर जाहीर होईल, असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बारावीचा निकाल मागील आठवड्यातच जाहीर झाला आहे. बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये होणार्या पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून एक संधी राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सोमवारी प्रारंभ झाला. दि. 9 जूनपर्यंत अर्जाची मुदत असणार आहे.
विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत आवेदनपत्रे 9 जूनपर्यंत दाखल करायची आहेत. दि. 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे, तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी दि. 14 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.