एसटीचे आरक्षण फुल्ल: पहिली दिवाळी विशेष गाडी रवाना, पुण्यातून 1 हजार 55 गाड्यांचे एसटीचे नियोजन

एसटीचे आरक्षण फुल्ल: पहिली दिवाळी विशेष गाडी रवाना, पुण्यातून 1 हजार 55 गाड्यांचे एसटीचे नियोजन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीनिमित्त गावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेत, एसटीकडून दिवाळी विशेष ज्यादा 1 हजार गाड्या पुण्यातून सोडण्यात आल्या आहेत. त्यातील पहिली गाडी नागपूरकडे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानातून रवाना झाली आहे. दिवाळीनिमित्त मिळालेल्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणार्‍या आणि शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या पार्श्वभुमीवर प्रवाशांच्या सोयीकरिता एसटीच्या पुणे विभागाकडून ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनसह खडकी येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानातून सोडण्यात येत आहेत. यातील पहिली गाडी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानातून नागपूर सोडण्यात आली. तिचे उद्घाटन प्रवाशांच्याच हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

अकोला येथील प्रवासी अभय अहिरराव या प्रवाशाच्या हस्ते उद्घाटन झाले. एसटीचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे, कामगार अधिकारी ऍड. सचिन भुजबळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते. पुण्यातील एसटीच्या आगारातून प्रवाशांना 19 ते 23 ऑक्टोबर 2022 या पाच दिवसांच्या कालावधीत या विशेष गाड्या उपलब्ध होतील. यामुळे दिवाळी सुट्टीत प्रवाशांना यंदा एसटी गाड्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास एसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त आहे.

विशेष 1055 गाड्यांपैकी 125 गाड्यांची आरक्षणे सध्या फुल्ल झाली आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदानातून मराठवाडा, विदर्भ, लातूर, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा यवतमाळ, अकोला आणि खानदेश या ठिकाणांवर जाण्यासाठी या अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news