जिनेव्हा; पुढारी ऑनलाईन
Russia-Ukraine War : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरु आहे. यात युक्रेनमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. रशियाने पाच दिवस केलेल्या आक्रमणात युक्रेनमध्ये किमान १०२ नागरिक मारले गेले आहेत. यात सात मुलांचा समावेश आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने (UN Human Rights Council) दिली आहे. प्रत्यक्षात मृतांचा आकडा याहीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, अशी भीती संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने व्यक्त केली आहे.
यातील बहुतांश नागरिकांचा मृत्यू हा रशियाकडून करण्यात आलेल्या मल्टी-लाँच रॉकेटच्या गोळीबारात तसेच एअर स्ट्राइक आणि स्फोटक शस्त्रांच्या हल्ल्यात झाला असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UN Human Rights Council) प्रमुख मिशेल बॅचेलेट (Michelle Bachelet) यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत १४ मुलांसह ३५२ नागरिक मारले गेले असल्याचा दावा युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. रविवार हा त्यांच्या सैन्यासाठी कठीण दिवस होता. कारण रशियन सैन्याने चोहोबाजूंनी गोळीबार सुरू ठेवला होता, असेही युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात पाचव्या दिवशीही युद्ध सुरू आहे. रशियाकडून होणार्या हल्ल्यांना युक्रेनकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. कीव्ह आणि खार्किव्हमध्ये रशिया आणि युक्रेनचे सैन्यात चकमकी सुरू आहेत. रशियाने रविवारी पेट्रोलियम बेससह युक्रेनमधील गॅस पाईपलाईनही उद्ध्वस्त केली होती. लगोलग रशियाकडून कीव्ह शहरावर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो, असा 'अलर्ट' युक्रेनकडून जारी करण्यात आला होता.
रशियाने आक्रमक भूमिका घेऊन युक्रेनवर (Russia-Ukraine War) हल्ले केले आहेत. यामुळे युक्रेनमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात सोमवारी बेलारूस सीमेजवळ द्विपक्षीय बोलणी होणार आहे. त्यासाठी युक्रेनचे शिष्टमंडळ रशिया सोबत द्विपक्षीय तोडगा काढण्यासाठी बेलारूस सीमेजवळ दाखल झाल्याचे वृत्त आहे.
याच दरम्यान युक्रेनियन सैन्याने म्हटले आहे की रशियन सैन्याने आक्रमणाची तीव्रता कमी केली आहे. तरीही काही भागात संघर्ष सुरु आहे. गेल्या पाच दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.