सोलापुरात सापडला पहिला ओमायक्रॉन रुग्ण | पुढारी

सोलापुरात सापडला पहिला ओमायक्रॉन रुग्ण

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापुरात ‘ओमायक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्याला 27 डिसेंबरला ओमायक्रॉन झाला होता. त्याच्यावर उपचार करून तो बरा झाला आहे. त्याच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह झाले आहेत. त्यामुळे रुग्णांपासून कोणालाही कसल्याही संसर्गाचा धोका नसल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी सांगितले. त्याचा अहवाल आज पान 2 वर

महापालिकेला प्राप्त झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबतची माहिती महापालिकेकडून दडविण्यात आल्याची चर्चा पालिका आवारात होती.

संपूर्ण देशात कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटने रुग्णसंख्या खूपच मोठ्या वेगाने वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून निर्बंध कडक करण्यात येत आहेत. राज्य शासनाकडूनही कडक निर्बंध लादण्यात आले असून गर्दी न करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत.

सोलापुरामध्येही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ‘ओमायक्रॉन’चा पहिला रुग्ण मिळून आल्याबाबतची अधिकृत माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. सापडलेला रुग्ण हा 27 डिसेंबर 2021 रोजी पॉझिटिव्ह आला होता. पुण्याच्या प्रयोगशाळेतून या रुग्णांचा ‘ओमायक्रॉन’चा अहवाल पॉझिटिव्ह आला.

या रुग्णावर 27 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधी अश्‍विनी रुग्णालयात उपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथे 2 जानेवारीपर्यंत रुग्णालयात ठेवण्यात आले. सध्या या रुग्णांची प्रकृती चांगली असून त्याच्या घरातील व संपर्कातील कुणीही पॉझिटिव्ह आलेले नाही. या रुग्णाचा 14 दिवसाचा होम आयसोलेशनचा कालावधीही पूर्ण झालेला आहे.

‘ओमायक्रॉन’ चा संसर्ग हा पहिल्या तीन दिवसांत होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. आता या रुग्णापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाही. त्यामुळे शहरवासियांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाचे नियम शहरवासियांना पाळावेत, असे आवाहन आरोग्य अधिकारी लोहारे यांनी केले आहे.

Back to top button