मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना दिल्या जाणार्या मदतीच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रत्येक कुटुंंबाला 10 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ही घोषणा केली. पूरस्थितीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून, बाधितांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही पवार यांनी यावेळी केला.
राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन केले. राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधीच्या निकषांमध्ये दुकानांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांना मदत देता येत नाही. तरीही अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी गेल्यावर्षीप्रमाणे मदत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. 25 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी दूरद़ृश्यप्रणालीद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिमसह अनेक जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.
गेल्यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस, यामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी 8 हजार 677 कोटी, तर यंदा मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाईसाठी 513 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. गेल्यावर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाईसाठी 1,500 कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच डीबीटी प्रणालीमार्फत 600 कोटी रुपये जिल्हाधिकार्यांनी संगणकीय प्रणालीमध्ये मंजूर केले असून, ते लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.