खंडाळा/नायगाव : पुढारी वृत्तसेवा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर आपला देश ५० वर्षे मागे गेला असता. त्यांनी समाजाला प्रकाश देण्याचे कार्य केले. राज्य सरकार महिला सक्षमीकरण करण्यासाठी कुठेच कमी पडणार नाही. आ. जयकुमार गोरे यांच्या मागणीनुसार, राज्य सरकार नायगाव येथे प्रशस्त स्मारक उभारणीसाठी १० एकर जागा खरेदी करून १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नायगाव (ता. खंडाळा) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ना. छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. अतुल सावे, ना. आदिती तटकरे, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नायगाव येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिक्षणासाठी प्रोत्साहन निधी देण्यात सरकार कमी पडणार नाही. महिलांना अनेक सवलती दिल्या जात आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नोकरदार महिलांसाठी शक्ती सदन नावाने वसतिगृह सुरू करतोय. नायगावला वर्षभर पर्यटक, अभ्यासक येतील, असे काम करू.
ना. भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले जयंतीचा सोहळा देशभरात साजरा केला पाहिजे. भिडे वाड्यातील लढ्याला यश आल्याने १०० कोटींचा निधी दिल्याने लवकरच भूमिपूजन होईल. मुलींना एनडीएमधील प्रशिक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रबोधिनीला २४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रबोधिनीसाठी लवकरात लवकर जागाही उपलब्ध करून द्यावी.
यावेळी ना. अतुल सावे, ना. शंभूराज देसाई व रूपाली चाकणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, सरकारने राज्यात अनेक स्मारके उभारली आहेत. परंतु, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे कार्य पाहता त्यांचे स्मारक हे कमी जागेत व खूप छोटे आहे. फुले दाम्पत्याच्या त्यागाची जाणीव करत सरकारने स्मारकासाठी १० एकर जागा खरेदी करावी व १00 कोटी रुपयांचा निधी द्यावा. या समाजसुधारकांच्या कार्याला साजेसे असे स्मारक करावे. आ. गोरे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला.