Targeted Killings | टार्गेट किलिंगची दहशत! १० काश्मिरी पंडितांच्या कुटुंबांनी काश्मीर खोरे सोडले

Targeted Killings | टार्गेट किलिंगची दहशत! १० काश्मिरी पंडितांच्या कुटुंबांनी काश्मीर खोरे सोडले

जम्मू- काश्मीर : पुढारी ऑनलाईन; दहशतवाद्यांनी अलीकडेच अनेक टार्गेट किलिंग (Targeted Killings) केल्यामुळे काश्मिरी पंडित कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भितीच्या वातावरणात दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील १० काश्मिरी पंडित कुटुंबांनी आपले गाव सोडून जम्मूत आसरा घेतला आहे. चौधरीगुंडच्या रहिवाशांनी सांगितले की अलीकडील दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मिरी पंडितांमध्ये भितीचे वातारण आहे. काही काश्मिरी पंडित कुटुंबे काश्मीरमध्ये १९९० च्या दशकात दहशतवादाच्या अत्यंत कठीण काळातदेखील राहिली होती. त्यांनी आपली घरे सोडली नव्हती. पण ही कुटुंबे काश्मीर खोरे सोडून जम्मूत दाखल झाली आहेत.

काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट यांची शोपियान जिल्ह्यातील चौधरीगुंड गावात त्यांच्या घराबाहेर १५ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शोपियानमध्ये १८ ऑक्टोबर रोजी मोनीश कुमार आणि राम सागर हे घरात झोपलेले असताना दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. (Targeted Killings)

"३५ ते ४० काश्मिरी पंडितांचा समावेश असलेली दहा कुटुंबे भीतीपोटी आमच्या गावातून स्थलांतरित झाली आहेत," असे चौधरीगुंड गावातील एका रहिवाशाने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते. लोक गाव सोडून जात असल्याने गाव रिकामे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "काश्मीर खोऱ्यात राहण्यासाठी आता परिस्थिती अनुकूल नाही. काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या घटनांमुळे आम्ही भीतीच्या छायेत जगत आहोत. आमच्यासाठी कोणतीही सुरक्षा नाही," असे आणखी एका गावकऱ्याने सांगितले. वारंवार आम्ही सुरक्षा व्यवस्थेसाठी मागणी केली. पण गावापासून दूर पोलिस चौकी उभारण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

काश्मीर पंडितांनी सफरचंद काढणीचे काम सोडून दिले असून ते जम्मूला पोहोचले आहेत. ते नातेवाईकांसोबत तेथे राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news