

गिमवी (गुहागर) ; पुढारी वृत्तसेवा
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट गेल्या 5 तासांपासून ठप्प झाला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील असलेल्या या कुंभार्ली घाटात एका वळणावर एक ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
रस्त्याला पडलेला खड्ड्यांमुळे एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने ही वाहतूक ठप्प झाली. यामुळे गेल्या पाच ते सहा तासांपासून ही वाहतूक पूर्णत ठप्प आहे. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संताप तर दुधाच्या गाड्या अद्याप न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.
गेले अनेक दिवस या घाटात असलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थ करत होते, मात्र प्रशासनाने लक्ष न दिल्याने ही स्थिती उद्भवल्याचे समोर येत आहे.