

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : मौजमजा आणि चैनीसाठी मैत्रिणीच्या मदतीने भाचीने नवीन चिखली पैकी सोनतळी (ता. करवीर) येथील आत्त्याचे घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याचा प्रकार करवीर पोलिसांच्या चौकशीत उघड झाला. पोलिसांनी अल्पवयीन भाचीसह मैत्रीण स्वाती सुदर्शन कांबळे (वय १९, रा. नवीन चिखली पैकी सोनतळी) हिला अटक केली. संशयिताकडून २३ ग्रॅम सोन्याचे दागिने व २० हजाराची रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयितांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली देत चोरलेला ऐवज पोलिसांच्या स्वाधिन केला आहे.
सोनतळी येथील रुक्साना शाहरूख झाडी (वय ३५) लहान मुलासमवेत राहतात. त्या कोल्हापूर येथील रुग्णालयात नोकरीला आहेत. भावाचीच मुलगी असल्याने संशयित अल्पवयीन मुलीचा त्या लाड करीत. कपडेलत्त्यांसह तिच्या शाळेतील खर्चाची जबाबदारीही आत्या पेलत असे. भाचीच्या भरवशावर घर सोडून त्या कामावर जात. गुरुवारी (दि. २१) सायंकाळी झाडी कामावर गेल्या होत्या. सकाळी परतल्यानंतर घरातील सर्व साहित्य विस्कटलेले होते. बॅगा, कपाट उघडलेले दिसून आले. कपाटातील २३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने व २० हजाराची रोकडही लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
झाडी यांच्या घरात घरफोडी झाल्याने नातेवाईकांसह संशयित भाचीही मैत्रिणीसमवेत घटनास्थळी आली होती. आत्याची तिने विचारपूसही केली होती. करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर व पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. सोनतळी येथील दोन मुली सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी वडणगे फाटा येथील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक आकाशदीप भोसले, जालिंदर जाधव, हवालदार विजय तळसकर, सुजय दावणे यांना मिळाली. पथकाने दोन्हीही मुलींना ताब्यात घेतले. मोपेडची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याचे दागिने, रोकड आढळून आली. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी प्रश्नांचा भडीमार करताच दोघींनी आत्याचे घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
एक वर्षापूर्वी अल्पवयीन भाचीने आत्या झाडी यांच्या घरी चोरी करून रोख रक्कम लंपास केली होती. आत्याचा भाचीवर दाट संशय होता. आई-वडिलांसह नातेवाईकांनी तिला दरडवल्याने तिने चोरीची कबुली देऊन पैसे परत केले होते. भावाचीच मुलगी असल्याने बदनामी टाळण्यासाठी या घटनेवर पडदा टाकण्यात आल्याचेही किशोर शिंदे यांनी सांगितले. चोरलेल्या रकमेतून दोघींनी स्वतःसाठी महागडे कपडे खरेदी केले होते. मौजमजा व चैनीसाठी आत्याचे घर फोडल्याचे अल्पवयीन भाचीने सांगितले.
हेही वाचा :