

पुढारी ऑनलाईन डेस्क : सातारा, पुढारी वृत्तसेवा : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या राष्ट्रीय टेनिसपटूचा मृत्यू झाला आहे. राज क्रांतीलाल पटेल (वय-32, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) असे युवकाचे नाव आहे. तो राष्ट्रीय पतळीवरील टेबल टेनिस खेळाडू म्हणून परिचित होता.
कोरोनानंतर सातारा हील हाफ मॅरेथॉन उत्साहात पार पडली. मॅरेथॉनला सुरुवात दिमाखात झाली. स्पर्धेत राज पटेल पुन्हा माघारी येत असताना अचानक धावमार्गावर पडला. ही घटना समोर येताच त्याला तत्कळ मॅरेथॉन संयोजकांनी यशवंत हॉस्पिटलला उपचारासाठी हलविले. मात्र हॉस्पिटमध्ये पोहचण्यापूर्वीच राज पटेलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर राज यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवून शवविच्छेदन करण्यात आले व तातडीने त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. तरुण खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संयोजकांनी व सातारकरांनी हळहळ व्यक्त केली आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील प्रसिध्द उद्योजक व पटेल पेट्रो या कंपनीचे मालक कांतीलाल (कनुभाई) पटेल यांचा राज पटेल हा एकुलता एक मुलगा होता. उच्चविद्याविभूषीत राज यांनी आयआयटीएन पदवी संपादन केली होती. मनाने निर्मळ व खिलाडू वृत्तीचा राज हा नेहमीच विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत असे. जीवन लॅबरोटरीच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) येथे कॅम्प आयोजित करून उद्योजकांना व्हॅक्सीनेशन करून सामाजिक कार्यात असलेली त्यांची तत्परता दाखवून दिली होती. कोल्हापूरचे प्रसिद्ध डॉ. श्रीकांत कुलकर्णी व अस्मिता कुलकर्णी यांचे ते जावई होत. त्यांच्या मागे पत्नी डॉ. तन्वी कुलकर्णी, ११ महिन्यांचा मुलगा आहे. राज यांच्या जाण्याने पटेल परिवार पोरका झाला आहे. एक चांगला हुशार व उमदा उद्योजक हरपल्याने गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
हुशार व उमदा युवा उद्योजक हरपला
अत्यंत हुशार व उमदे व्यक्तिमत्व असलेल्या युवा उद्योजक राज पटेल यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. गोशिमाचे निमंत्रित संचालक कांतीलाल पटेल यांच्यावर कोसळलेल्या दुःखात गोशिमा परिवार सहभागी आहे. ईश्वर त्यांना या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.
– मोहन पंडितराव अध्यक्ष गोशिमा
हेही वाचलंत का ?