

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. शीघ्र कृती दलांसह राज्य राखीव दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व 58 मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
पोलिस अधिकार्यांसह एक पोलिस, एक होमगार्ड अशी पथके तैनात करण्यात आली आहेत. कसबा बावडा, शिरोली, गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, कुंभोज, नरंदे, टोप, शिये, निगवे दुमाला येथील मतदान केंद्रांवरही मोठा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी, पोलिस कर्मचार्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मतदानासह मतमोजणी काळात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शीघ्र कृती दलाची 7, तर राज्य राखीव दलाचीही पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत, असे जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकारांना सांगितले. शाहूपुरी, करवीर, शिरोली एमआयडीसी, गांधीनगर, वडगाव, हातकणंगले पोलिस ठाण्यांतील अधिकार्यांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केल्याचेही ते म्हणाले. 125 पोलिस, 100 होमगार्ड कार्यरत आहेत.