

कोल्हापूर; सतीश सरीकर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ अखेर काँग्रेसला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीअंतर्गत घेण्यात आला आहे. शिवसेनेने माघार घेतल्याने या मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसचा उमेदवार असेल. परिणामी काँग्रेस विरूध्द भाजप अशी दुरंगी काटाजोड लढत होईल. बालेकिल्ला असल्याने शिवसेनेने या ठिकाणी काँग्रेससह मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह धरला होता. बैठकींच्या फेर्यानंतर अखेर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या माघारीचा काँग्रेसला फायदा होतो की, भाजपला हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. परिणामी काँग्रेसच्या आमदारांचे निधन झाल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आग्रही होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्याने शिवसेनेला मिळावा यासाठी प्रयत्नशिल होते. तसेच राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदींनी काँग्रेसला जागा सोडली तरी शिवसेनेचा मतदार काँग्रेसला मतदान करेल काय ? शिवसेनेच्या मतदानाचा भाजपला होईल, अशी भिती व्यक्त करत होते. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ महाविकास आघाडीकडेच कायम ठेवू, अशी शिवसेनेची मागणी होती.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून अपवाद वगळता शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. १९९५ व १९९९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांनी विजय मिळविला होता. २००४ मध्ये मात्र काँग्रेसजच्या मालोजीराजे यांनी साळोखे यांचा पराभव केला. २००९ मध्ये मालोजाराजे यांचा पराभव करून राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकविला. २०१४ मध्येही क्षीरसागर यांनी विजय मिळविला. २०१९ मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी क्षीरसागर यांची हॅटट्रीक रोखली. परंतू पराभवानंतरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद दिले. गेल्या दोन वर्षात क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील रंकाळा संवर्धन, रस्त्यासह विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणल्याने शिवसेनेने मतदारसंघावर हक्क सांगितला होता. ही जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
हे ही वाचलं का ?