

किणी : घरे न तोडण्याबाबतचा न्यायालयाचा स्थगिती आदेश आला खरा.. पण, तोपर्यंत पालिका प्रशासनाने बळाचा वापर करत ४८ वर्षांचा संसार उध्वस्त केला होता. पालिकेच्या या गुंडाराज विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बंडखोर सेनेचे संस्थापक शिवाजी आवळे यांनी दिला आहे. (Kolhapur News)
पेठवडगाव नगरपालिका हद्दीत गेली ४८ वर्षे साठे, निकम व चव्हाण ही तीन कुटुंबे राहत आहेत. या कुटूंबानी सुरवातीपासुन पालिकेला घरफाळा, पाणीपट्टी भरली आहे. वीज मंडळाने वीजही पुरविली आहे. असे असताना पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या आड ही तीन घरे येत असल्याचे सांगत तातडीने ही जागा खाली करण्याच्या नोटिसा या कुटुंबांना लागू केल्या होत्या.
या विरोधात कुटूंबानी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायलायचा निर्णय होईपर्यंत थांबा अशी विनंती या कुटूंबानी पालिका प्रशासनाला केली होती. मात्र कुटुंबाची विनंती धुडकावत सोमवारी साठे यांचे घर पाडण्यात आले. निकम कुटुंबातील माय लेकींनी घराच्या छतावर चढुन ठिय्या मारत न्यायालयाचा आदेश येईपर्यंत हात लावायचा नाही अशी कणखर भूमिका घेतल्याने प्रशासनाच्या पथकाने तेथून काढता पाय घेतला होता. (Kolhapur News)
मात्र आज सकाळी (दि.23) नऊ वाजता पुन्हा बुलडोझरसह मुख्याधिकारी सुमित जाधव व पालिका प्रशासनाने या घरांच्याकडे मोर्चा वळवला.सर्वप्रथम निकम यांच्या घराचे विद्युत पुरवठा तोडण्यात आला. यावेळी निकम यांनी स्वतःला घरात कोंडून घेऊन बरेवाईट करून घेण्याचा इशारा दिल्याने चव्हाण यांचे घर तोंडण्यासाठी गेले.
चव्हाण कुटुंबातील स्त्रियांनी अकरा वाजेपर्यंत न्यायलायचा आदेश प्राप्त होईल तोपर्यंत कारवाई थांबविण्याची विनंती केली. पण, त्यांच्या विनंतीला न जुमानता कारवाई करण्यावर पथक ठाम राहिले. विरोध करणाऱ्या स्त्रियांवर पोलीस बळाचा वापर करत घरातील भांडी व साहित्य बाहेर काढले. जेवणाचे साहित्य, इतर संसारोपयोगी वस्तु बाहेर फेकण्यात आल्या आणि त्या घरावर डोझर चालविण्यात आला.
ही घटना घडेपर्यंत पालिकेच्या कारवाईला ३० एप्रिलपर्यंत स्थगिती देत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश प्राप्त झाला. तोपर्यंत भरला संसार उध्वस्त करून पोलीस व पालिका प्रशासन गेले होते. दरम्यान या कारवाई विरोधात सायंकाळी बंडखोर सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संपूर्ण कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला.
पोलीस व प्रशासनाच्या संगनमताने हिटलरशाही सुरू असल्याचा आरोप करत शासनाच्या नियमाप्रमाणे या कुटुंबाचे पुनर्वसन न केल्यास या गुंडगिरी विरोधात १ मे पासुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थापक-अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी दिला. यावेळी निलेश मोहिते, रविंद्र माळी, अर्जुन वाघमारे, विशाल सौंदडे,अनिकेत भोरे, सुनीता नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चव्हाण कुटुंबियांनी वडगाव शहरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम केले, कोणत्याही सोयी नव्हत्या त्या वेळी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम या कुटुंबीयांनी केले. त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून तत्कालीन पालिका कारभाऱ्यांनी त्यांना राहण्यासाठी ती जागा रितसरपणे दिली होती.
मात्र याचा कोणताही विचार न करता अथवा पुनर्वसन अथवा पर्यायी जागा न देता पालिकेने चव्हाण कुटूंबानी केलेल्या कामाची उतराई संसार उध्वस्त करून केल्याची संतप्त भावना सौ.संगीता चव्हाण यांनी व्यक्त केली.
काही वर्षांपूर्वी नागरिकांच्या व बाजारकरूंच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याचा सर्वांना उपयोग होत होता आजच्या कारवाईत हे पालिकेचे स्वच्छतागृह देखील पाडण्यात आले. याबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा :