

जयसिंगपूर : राजेंद्र, तुला मुलगा नाही तर राहू दे. या तीन मुली ही माझी नातवंडे आहेत. त्यामुळे मी मेलो तरी याच नाती मला नातू म्हणून खांदा द्यायला हव्यात, अशी म्हणणारी आजी इंदुमती धोंडिराम दाभाडे (वय 80) यांचे बुधवारी निधन झाले. मुलगा राजेंद्र दाभाडे पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी कोणताही विचार न करता आपली पत्नी म्हणजेच सून विजया व नात रेणू, तृप्ती व समृद्धी यांनी आजीच्या पार्थिवाला खांदा देऊन येथील श्री संत रोहिदास चर्मकार स्मशानभूमीत पार्थिवाला भडाग्नी दिला आणि या पुरोगामी चळवळीतून नवा विचारांचा पायंडा शिरोळ येथे रचला.
शिरोळ येथील यादवनगर भागातील सेवानिवृत शिक्षिका श्रीमती इंदुमती धोंडिराम दाभाडे पुरोगामी विचारांच्या होत्या. त्यांनी काही वर्षांपूर्वी नेत्रदान व त्वचादान करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रात्री उशिरापर्यंत नेत्रदान व त्वचादान प्रक्रिया करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजेंद्र दाभाडे हेही पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन आईच्या पार्थिवाला सून व तीन मुलींनी खांदा देण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे मृतसमयीचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर सून विजया, नात रेणू, तृप्ती व समृद्धी यांनी पार्थिवाला खांदा दिला. त्यानंतर अर्जुनवाड मार्गावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तीन नातींनी भडाग्नी दिला. पुरुष प्रधान संस्कृतीत अशाप्रकारे पुरोगामी विचार रुजविण्यासाठी शिरोळच्या दाभाडे कुटुंबीयांनी नातींनी दिलेला खांदा व भडाग्नी केलेला निर्णय समाजासमोर आदर्श आहे.
सून विजया या घरकाम करतात. नात रेणू व तृप्ती यांचे बीए शिक्षण झाले असून, त्या स्पर्धा परीक्षा करीत आहेत, तर लहान नात समृद्धी दहावीत शिकत आहे. राजेंद्र दाभाडे यांचा इलेक्ट्रिक व्यवसाय आहे. दाभाडे कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
नेत्रदान व त्वचादानही
इंदुमती दाभाडे यांच्यावर सांगली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी रात्री 10 वाजता निधन झाले. त्यानंतर त्याचे नेत्रदान व त्वचादान करण्यात आले. त्यामुळे मरावे तरी कीर्तीरूपे उरावे, हा संदेश देऊन पुरोगामी विचार जोपासला आहे.