

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची बैठक सोमवारी मुंबईत झाली. या बैठकीत आपल्या सर्व 13 खासदारांना उमेदवारी मिळवून देण्याची आग्रही मागणी आपण केली आहे. या सर्वांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांची बैठक मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे होत आहे. या बैठकीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट होईल. दरम्यान, कोल्हापूरच्या जागेसाठी भाजपने कमालीचा आग्रह धरला आहे. धनंजय महडिक व समरजित घाटगे यांची नावे चर्चेत आहेत. समरजित घाटगे यांना उमेदवारी द्यायची; पण ते शिंदे शिवसेनेच्या
धनुष्यबाण चिन्हावर लढतील का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले.
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेच्या 13 खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला साथ दिली. या सर्वांना उमेदवारी देण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या जा बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यातून शिंदे शिवसेनेला 8 ते 9 जागा देण्यात येणार असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या 13 पैकी कोणत्या खासदाराचा पत्ता कापला जाणार याची चर्चा सुरू झाली. त्यातच सोमवारी संजय मंडलिक यांना उमेदवारी नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यावर मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे बैठकीला गेलेल्या मंडलिक यांनी हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे सांगितले.
दरम्यान, भाजपने कोल्हापूरच्या जागेसाठी कमालीचा आग्रह धरला आहे. त्यासाठी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांची नावे चर्चेत आहेत. घाटगे जर धनुष्यबाण चिन्हावर लढायला तयार असतील तर ही जागा शिंदे शिवसेनेला देऊन भाजपचा उमेदवार त्यांना देण्याची राजकीय खेळीही होऊ शकते, अशी चर्चा होती. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्या गटाचे खासदार रात्री उशिरापर्यंत थांबून होते. महायुतीच्या जागावाटपात शिंदे शिवसेनेला 13 खासदार असूनही केवळ 8 ते 9 जागा देण्यात येणार असल्याचे समजल्यापासून त्यांच्या गटातील खासदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळेच आपल्या उमेदवारीची खात्री करून घेण्यासाठी या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तळ ठोकला आहे.
दरम्यान, हातकणंगले मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उमेदवार निवडीत आपल्याला विश्वासात घेत नसल्याचे सांगून आपल्या भावालाच निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर धैर्यशील माने यांना टोकाचा विरोध झाल्यास पर्यायी उमेदवार कोण याचीही चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
जिंकणे याच निकषावर चर्चा
महायुतीमध्ये हमखास जिंकून येणारा उमेदवार याच निकषांवर चर्चा सुरू आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला त्यानंतर निश्चित होऊ शकतो. काही ठिकाणी उमेदवारांची अदलाबदलही होऊ शकते, असे सांगण्यात आले. त्यामुळेच महायुतीचे जागावाटप लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.