

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चार वर्षांपूर्वी गेलेली सोन्याची चेन कुणी चोरली, याची शहानिशा करण्यासाठी माजगाव (ता. पन्हाळा) येथे एका देवर्षीच्या सांगण्यावरून त्याच्याच समोर महिलेची विवस्त्र पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने पन्हाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयित इसम, त्याची आई आणि देवर्षीवर गुन्हा नोंद केला.
माजगाव (ता. पन्हाळा) येथील भैरीनाथ शिवाजी महाजन याची सोन्याची चेन 4 वर्षांपूर्वी चोरीला गेली होती. ती चेन एका महिलेने चोरल्याचे त्याच गावातील देवर्षी रामू कोलकर ऊर्फ रामा मिस्त्री याने भैरीनाथला सांगितले. त्यावरून चोरीची शहानिशा करण्यासाठी भैरीनाथ व त्याची आई लक्ष्मी शिवाजी महाजन यांनी देवर्षीसमोरच महिलेची विवस्त्र पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला होता. याप्रकरणी पीडित महिलेने पन्हाळा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोन्याची चेन चोरीस गेल्यावर 4 वर्षांपूर्वी भैरीनाथ हा गावातीलच रामा मिस्त्री या देवर्षीकडे गेला होता. तेव्हा ती चेन एका महिलेने चोरून तिच्या आईला दिली आहे, असे देवर्षीने भैरीनाथला सांगितले. त्यामुळे भैरीनाथने संबंधित महिलेला जाब विचारला; पण महिलेने आपण चेन घेतली नसल्याचे भैरीनाथ यांना वारंवार सांगितले. दरम्यान, देवर्षी रामा मिस्त्री हा संबंधीत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करीत होता. पण त्यास महिला ठामपणे नकार देत होती.
ऑगस्ट महिन्यात भैरीनाथ याने महिलेला चोरीचा जाब विचारला. तसेच संशयाची शहानिषा करण्यासाठी देवर्षीच्या मदतीने पूजा करण्याचे ठरवले. त्यानुसार आई लक्ष्मीला सोबत घेऊन भैरीनाथने देवर्षीच्या समोर पिडीतेची विवस्त्र पूजा केली. पूजेवेळी पिडीतेच्या अंगावरून लिंबू, हळद, कुंकू, खाऊची पाने ओवाळून टाकली. याबाबत पिडीत महिलेने शुक्रवारी पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली. भैरीनाथचा संशय दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याने फिर्यादीस वेळ झाला, असेही पिडीतेने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करीत आहेत.