

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि. 30) रमणमळा येथील बहुद्देशीय सभागृहात होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून पहिला निकाल साडेदहाच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल घोषित होतील, अशी अपेक्षा आहे. बाजार समितीत सत्तांतर होणार की सत्ताधारीच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मतमोजणीसाठी 140 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून 36 टेबलवर दोन फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत ग्रामपंचायत, व्यापार, अडते व हमाल तोलाईदार गटांची मतमोजणी होईल.
बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. आ. विनय कोरे यांना काँग्रेस वगळता अन्य पक्षांशी चर्चा करण्याचे अधिकार दिले होते. त्याप्रमाणे बोलणीही सुरू होती. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक जागा देण्याचे ठरले पण उमेदवार निवडीचे अधिकार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याकडे घेतले. त्यामुळे ठाकरे गटातून नाराजी व्यक्त होत होती. चर्चा सुरू असतानाच सत्तारूढ आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांशी भाजपच्या नेत्यांनी चर्चा सुरू केली. शिंदे गटाने देखील सोबत येण्याचे ठरविले. जागा वाटपाबाबत बैठका झाल्या. एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरले परण अचानक उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आघाडीतून बाहेर पडले. त्यामुळे विरोधी आघाडीतील नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत प्रचाराचा धडाका सुरू केला.
नेत्यांच्या उपस्थितीत बैठक
दोन्ही आघाडीच्या वतीने आपापल्या उमेदवारांची व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नेत्यांच्या उपस्थित झाली. यावेळी मतमोजणी केंद्रात प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची बैठक जिल्हा बँकेत झाली. या बैठकीस आ. हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, भैया माने आदी उपस्थित होते. शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची बैठक अमृतसिद्धी हॉलमध्ये झाली. या बैठकीस माजी आ. चंद्रदीप नरके, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर उपस्थित होते.