

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी काँग्रेसच्या पी. एन. पाटील गटाचे भारत बाबासाहेब पाटील- भुयेकर यांची तर उपसभापतीपदी जनसुराज्यचे शंकर बाबासो पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सत्ताधार्यांची एकजूट, विरोधकांचा विस्कळीतपणा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेले अपयश यामुळे सत्ताधार्यांना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता कायम राखण्यात यश आले. व्यापारी गटात मात्र पुन्हा एकदा सत्ताधार्यांना अपयश आले आहे. या विजयामुळे जनसुराज्य शक्ती व शिवसेना शिंदे गटाच्या मदतीने महाविकास आघाडी भक्कम असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधार्यांचे प्रयत्न सुरू होते. सर्वसमावेशक एकच आघाडी करण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या. आ. पी. एन. पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, संजय घाटगे यांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू शेतकरी आघाडी स्थापन केली होती. हे करत असताना त्यांना भाजप व शिवसेनेतील दोन्ही गटांतील पोटगटांना सोबत घेण्यात यश आले नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला व विरोधी आघाडी बांधण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी स्थापन केली. त्यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाडिक गट, समरजितसिंह घाटगे, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राहुल देसाई यांचा समावेश होता; परंतु २४ तासांतच या आघाडीत बिघाडी झाली आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पवार व देवणे आघाडीतून बाहेर पडले होते.
एवढेच नव्हे तर त्यांच्या गटाच्या उमेदवारानेही माघार घेतली. त्यामुळे या आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते.
हे ही वाचा :