

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: प्रत्येक गावात आणि वाड्यावस्त्यावर नळाद्वारे प्रत्येक घरात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत खेड तालुक्यातील ३१ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनाना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील काही कामासाठी निविदा प्रक्रीया सुरु झाली आहे, तर काही कामे प्रत्यक्षात सुरु झाल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए. बी. चाटे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनेतुन २०२४ पर्यत प्रत्येक गावाला नळपाणीपुरवठा योजनेसह हर घर जल या प्रमाणे प्रत्येक घरात नळाने पाणी पोहचवण्याचे काम जिल्हा परीषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील १८६ गावासह वाड्यावस्त्यांवरील पाणीपुरवठा योजनांचे आराखडे तयार करण्याचे काम पुर्ण झाले. पाच कोटी पेक्षा जास्त निधीच्या २१ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत पुर्ण केल्या जाणार आहे. तर १६५ नळपाणीपुरवठा योजना जिल्हा परीषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीत राबविण्यात येणार असुन पैकी ३१ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनाच्या कामांचा कार्यारंभ आदेश काढण्यात आल्याची माहिती अभियंता ए. बी. चाटे यांनी दिली.
खेड तालुक्यातील ३१ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांचा कार्यारंभ आदेश १७ नोव्हेबंर २०२१ पासुन टप्याटप्याने १८ जुलै २०२२ पर्यत देण्यात आला. ही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपनीला सहा महिने ते दीड वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मंजुर नळपाणीपुरवठा योजनाची गावे व कंसात अंदाजपत्रकीय रक्कम पुढीलप्रमाणे:- ढोरे भांबुरवाडी-जरेवाडी (१ कोटी २८ लाख), खरपुडी खुर्द (५३ लाख ३५ हजार), गाडकवाडी (६५ लाख १३ हजार), कान्हेवाडी बु. (१ कोटी ३२ लाख ७ हजार), माजंरेवाडी (६४ लाख ३२ हजार), सांडभोर वाडी (१ कोटी १० लाख ७५ हजार), राक्षेवाडी (९८ लाख २२ हजार), बहुळ (१ कोटी ९८ लाख ९८ हजार), तळ्याची ठाकरवाडी-दोंदे (१ कोटी ९९ लाख ९९ हजार), चिखलगाव (५७ लाख ६७ हजार), साबळेवाडी (५९ लाख ३२ हजार), वाळद (१ कोटी १५ लाख ३६ हजार), गोसासी (१ कोटी ६३ लाख ८४ हजार), करंजविहिरे (६३ लाख ९४ हजार), गुळाणी (१ कोटी ४९ लाख ९८ हजार), कोये (३ कोटी २ लाख ५ हजार), पापळवाडी (६६ लाख ४१ हजार), वडगाव पाटोळे (१ कोटी ६२ लाख), बहिरवाडी (९१ लाख ३२ हजार), गोनवडी (२१ लाख ३७ हजार), भिवेगाव-भोरगिरी (२० लाख ७ हजार), साबुर्डी (१ कोटी २८ लाख ४२ हजार) आणि खालुंब्रे (४ कोटी १० लाख २७ हजार).
खेड तालुक्यातील पाच कोटीहुन अधिक अंदाजपत्रक रक्कमेच्या नळपाणीपुरवठा योजना या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अखत्यारित आल्या आहे. या योजनांचे आराखडे तयार झाले आहेत. मात्र प्रशासकीय मंजुर मिळाली नाही, त्या २१ गावांची नावे पुढीलप्रमाणे :- निमगाव खंडोबा, दावडी, वरुडे, वाफगाव, कनेरसर, पुर, चिचंबाईवाडी, वाकळवाडी, जऊळके बु., निघोजे, म्हाळुंगे, खराबवाडी, काळुस, रासे, मरकळ, सोळु, च-होली खु., गोलेगाव, पाईट, कडुस आणि किवळे.
या गावापैकी पुर्व पट्यातील वरुडे वाफगाव परीसरातील विविध गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चासकमान धरणातुन कडुससह ३१ गावांची नळपाणीपुरवठा योजना युती सरकारच्या काळात १९९७ साली मंजुर झाली. चार पाच वर्षात योजना टप्याटप्याने कार्यान्वित केली. मात्र अनेक गावांनी पाणीपट्टी भरलीच नाही. दोन कोटीहुन अधिक वीजबिलाची रक्कम थकली आणि दोन वर्षात ही योजना बंद पडली. ती पुन्हा सुरु झाली नाही. पुन्हा गेल्या युतीच्या काळात याच पुर्व भागातील गुळाणी ते कनेरसर पट्यातील विविध गावातुन ओढा, नदी खोलीकरण, बंधारे बांधण्यावर कृषी सह विविध विभागानी कामे केली. दुर्दैवाने आजही उन्हाळ्यात या परीसरातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.