खरीप तर पावसाने नेला … आता रब्बी साठी भांडवल कोठून आणायचे ? शेतकऱ्यांना पडला मोठा प्रश्न

खरीप तर पावसाने नेला … आता रब्बी साठी भांडवल कोठून आणायचे ? शेतकऱ्यांना पडला मोठा प्रश्न
Published on
Updated on

नारायणगाव: पुढारी वृत्तसेवा :  अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग ,मका व भाजीपाल्यासारखी पिके हातची निघून गेली तर साठवणीत ठेवलेल्या कांद्याला बाजार भाव न मिळाल्याने कांदा सडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली अशा परिस्थितीत रब्बी पीक घेण्यासाठी भांडवल कसे उभे करायचे? हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना गावागावात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मुकावे लागले यामध्ये प्रामुख्याने काढणीस आलेल्या सोयाबीन शेतात पाणी साठल्यामुळे शेतकरी काढू शकला नाही तर दुसरीकडे धना, मेथी व इतर पालेभाज्या या सुद्धा शेतात सडून गेल्या तर जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात घेण्यात येणारे भाताचे पीक सुद्धा अतिवृष्टीमुळे अडचणी सापडले आहे.

जुन्नर तालुक्यातील शेतकरी साठवणीत ठेवलेल्या कांदा हा दिवाळी सणाच्या सुरुवातीस विक्रीस काढतो व याच पैशावर दिवाळी सण साजरा करत असतो मात्र कांद्याला भाव नसल्याने व अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी कांदा बराखीत सडल्यामुळे फेकून द्यावा लागला आर्थिक अडचणीमुळे शेतकरी वर्ग दिवाळी सणाला बाजारपेठेत खरेदी करताना फारसा दिसला नाही.

जुन्नर तालुक्यातील ओतूर, बनकर फाटा, डिंगोरे, मादारणे ओतूर या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते व या पिकाची लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान चालते यासाठी आवश्यक असणारे कांद्याची रोपे ही दीड महिन्यापूर्वीच विशिष्ट प्रकारचे वाफे तयार करून धरली जातात मात्र उगवून आलेल्या कांद्याच्या रोपांच्या वाफेत पाणी साठल्यामुळे मोला महागाची रोपे काही ठिकाणी सडून तर काही ठिकाणी वाहून गेल्याने आता लागवड करण्यास कांद्याचे रोप मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दरम्यान, खरीप हंगामात घेण्यात आलेल्या पिकांवरच शेतकऱ्याचे रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांचे गणित अवलंबून असते कारण खरीप हंगामात निघणाऱ्या पिकांच्या पैशावरच रब्बी हंगामासाठी आवश्यक शेतीची मशागत, बी- बियाणे, रासायनिक खते व इतर लागणारे वस्तूंची तजवीज करण्यात येते तसेच दिवाळी हंगामानंतर घरांमधील वयात आलेल्या मुला- मुलींचे लग्न समारंभ त्यांचे शिक्षण आरोग्य यासह सर्वच गोष्टींचे नियोजन शेतकरी करत असतो मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे सर्व गणितच कोलमडले आहे आज मितिला खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उधारीवर घेतलेले खते ,बी बियाणे, औषधे यांचे पैसे देण्याचे बाकी असतानाच रब्बी हंगामासाठी पुन्हा या आवश्यक गोष्टींसाठी पैशाची तजवीज कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न हा शेतकरी वर्गा समोर उभा आहे
शेतकरी वर्गाकडे पैसे नसल्याने शेती कामासाठी मजूर वर्ग आणायचा कुठून व त्यांना पैसे द्यायचे कुठून असा प्रश्न पडला असतानाच मजूर वर्गालाही आपली उपजीविका कशी करायची? काम कुठे व कशी शोधायचे? हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ऑनलाईन पिकपहाणीमुळे नुकसान भरपाई अडचणीत
शेतकरी वर्गाला आपल्या शेतातील पीक पाहणी लावण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या 'पीक पाहणी अँप'वर नोंदवावी लागते पण यासाठी अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे वस्तुतः पाहायला गेल्यावर खरंच सर्व शेतकरी वर्गाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का? हा संशोधन करायला लावणारा प्रश्न आहे मग अशावेळी पिक पाहणी नोंदवली नसल्यास त्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाचे नुकसान भरपाईचे पैसे खरच पोहचत असतील का यापूर्वी शेतकरी वर्गासाठी आलेले नुकसान भरपाई चे पैसे हे तलाठी वर्गाशी जवळीक असणाऱ्या धनधाडग्यांनीच लाटले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारे आदिवासी शेतकरी अँड्रॉइड मोबाईल आणणार कुठून या भागात नेमलेले तलाठी आठवडा ,पंधरवडा गावात जात नाही तर पीक पाहणी लागणार कशी मग येथील शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळणार कशी याचा बारकाईने विचार शासनाने करणे गरजेचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news