KGF Movies : ‘केजीएफ’च्या निमित्ताने…

KGF Movies : ‘केजीएफ’च्या निमित्ताने…
Published on
Updated on

सध्या देशभर 'केजीएफ : चॅप्टर 2'ची तुफान चर्चा होतेय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांत डब झालेल्या या मूळच्या कन्नड सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. 'केजीएफ'च्या (KGF Movies) निमित्ताने का होईना, लोक पुन्हा एकदा तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीच्या बरोबरीने कन्नड सिनेसृष्टीचं नाव घेऊ लागलेत.

तसं बघायला गेलं, तर कन्नड सिनेसृष्टी ही भारतातल्या महत्त्वाच्या सिनेसृष्टींपैकी एक आहे. पण आपल्याकडे 'साऊथचा सिनेमा' असं रूढ केलेलं लेबल लावून कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमे बघितले जातात आणि यात सर्वाधिक अन्याय होतोय, तो कन्नड सिनेमावर. एकेकाळी भारतीय समांतर सिनेचळवळीला खतपाणी घालणार्‍या कन्नड सिनेमाला 'साऊथ'च्या लेबलमुळे मसाला जॉनरचे टुकार सिनेमे बनवत तेलुगू सिनेमांच्या पंगतीत जाऊन बसावं लागलं. गेल्या दशकभरात मात्र हे चित्र बदलू लागलंय. सिनेरसिक पुन्हा एकदा चोखंदळपणे कन्नड सिनेमाच्या वाटा धुंडाळू लागलेत. या नव्या बदलात 2018 ला आलेल्या 'केजीएफ'चा मोलाचा वाटा आहे.

2018 संपायला उणापुरा एक आठवडा बाकी असताना प्रशांत नील लिखित-दिग्दर्शित आणि रॉकिंग स्टार यशची प्रमुख भूमिका असलेला 'केजीएफ : चॅप्टर 1' हा कन्नड सिनेमा हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला. सोन्याची तस्करी करणार्‍या मुंबईतल्या टोळीच्या एका भाडोत्री गुंडाचा गोल्डमाफिया होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे 'केजीएफ.' (KGF Movies) भारतातली सर्वात मोठी सोन्याची खाण असलेल्या कर्नाटकातल्या 'कोलार' खाणीची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे.

'केजीएफ' हा पॅन इंडिया म्हणजेच वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा कन्नड सिनेमा. हा सिनेमा प्रेक्षकांनी उचलून धरला. यश सोडला, तर या सिनेमातलं दुसरं कुठलंही नाव महाराष्ट्रात फारसं परिचित नव्हतंच. 'केजीएफ'आधीच यशला त्याच्या 'गुगली', 'गजकेसरी', 'मि. अँड मिसेस रामाचारी' आणि 'मास्टर पीस' या सिनेमांच्या हिंदी व्हर्जनमुळे बर्‍यापैकी फॅन फॉलोविंग मिळालं होतं. 'केजीएफ'ने ते आणखीनच वाढवलं.

'दाक्षिणात्य किंवा साऊथचे सिनेमे' या जुलमाच्या लेबलखाली आपली स्वतंत्र ओळख हरवत चाललेल्या कन्नड सिनेजगताला 'केजीएफ'मुळे नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर सिनेरसिक आवर्जून कन्नड सिनेमांचीही यादी चाळू लागले. यानिमित्ताने गेल्या दशकभरात आलेल्या कित्येक सिनेमांना पुन्हा प्रसिद्धी तर मिळालीच; त्याचबरोबर कन्नड सिनेमाचा सुवर्णकाळ म्हणून गणल्या जाणार्‍या जुन्या सिनेमांनाही कल्ट फॉलोईंग मिळू लागलं.

1934 ला आलेला 'सती-सुलोचना' हा पहिला कन्नड बोलपट. ऐतिहासिक आणि पौराणिक कथा-लोककथांवर आधारित सिनेमांनी कन्नड सिनेसृष्टीचा पाया रचला. 'मॅटिनी आयडॉल' राजकुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 1954 चा 'बेडरा कन्नप्पा' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला कन्नड सिनेमा होता. याच सिनेमातून साठचं दशक गाजवणार्‍या 'हास्य चक्रवर्ती' नरसिंहराजू यांनीही पदार्पण केलं.

राजकुमार, 'रिबेल स्टार' विष्णूवर्धन, अंबरीश, नरसिंहराजू, 'अभिनय सरस्वती' बी. सरोजादेवी, जयमाला, कल्पना, लोकेश, अनंत नाग, शंकर नाग, अरुंधती नाग, गिरीश कर्नाड, वैशाली कासारवल्ली या कलाकारांशिवाय कन्नड सिनेमाचा गौरवशाली इतिहास अपुरा आहे. टीव्ही मालिका असो, नाटक असो किंवा सिनेमा. या कलाकारांनी कन्नड भाषिकांच्या मनोरंजनाचा वारसा अव्याहतपणे चालू ठेवला.

सत्तर-ऐंशी-नव्वदच्या दशकात पुट्टण्णा कनगाल, गिरीश कासारवल्ली, गिरीश कर्नाड, शंकर नाग, पी. लंकेश, बी. व्ही. कारंंत अशा अनेक लेखक-दिग्दर्शकांनी कन्नड सिनेसृष्टीत पॅरलल सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. या काळात आलेल्या कन्नड सिनेमांनी भारतीय समांतर सिनेचळवळीत मोलाचं योगदान दिलंय. लोकप्रिय मालिका 'मालगुडी डेज'चं दिग्दर्शन शंकर नाग यांनीच केलं होतं. 1990 मध्ये शंकर नाग यांच्या अपघाती निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीचा खर्‍या अर्थाने पडता काळ सुरू झाला. (KGF Movies)

दहाएक वर्षांपूर्वी बंगलोरमध्ये राहणारी तरुणाई आपण कन्नड सिनेमे पाहतो हे सांगायलाही लाजायची, इतके वाईट दिवस कन्नड सिनेसृष्टीवर आले होते. सिनेजगतातलं ठराविक लॉबीचं राजकारण आणि भाषिक, प्रांतिक अस्मितेचा अभाव हे या पडझडीमागचं खरं कारण होतं. 1990 नंतरही चांगले सिनेमे बनतच होते; पण त्यांच्यातला एकसुरीपणा प्रेक्षकांना तेलुगू, तमिळ सिनेमांकडे वळवायला कारणीभूत ठरला. सुवर्णकाळ गाजवणारे कलाकार आता दुय्यम किंवा सहायक भूमिकेत दिसू लागले होते.

नेपोटिझमचं ग्रहण इथंही लागलेलं होतंच; पण प्रेक्षकांनी ते सरसकट नाकारलंही नव्हतं. शिवा – पुनीत राजकुमार, अर्जुन शारजा, 'किच्चा' सुदीप, उपेंद्र ही नवी पिढी प्रेक्षकांना भावत होती खरं; पण त्यांच्या सिनेमाला नंतर थंड प्रतिसाद मिळायचा. तेच तेच चेहरे, त्याच त्याच कथा, लोकलवरून ग्लोबल व्हायच्या नादात बोथट झालेली राजकीय, सामाजिक, भाषिक, प्रांतीय जाणीव कन्नड सिनेसृष्टीला मारक ठरली.

कित्येक गुणी कलाकारांनी शेवटी हिंदी, तेलुगू आणि तमिळ सिनेसृष्टीचा रस्ता धरला. आपल्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले प्रकाश राजही इथलेच. अगदी ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोणही इथलीच. सुदीप, उपेंद्र, अर्जुन शारजा यांनाही तेलुगू, तमिळ सिनेमांत चांगली कामं मिळत होती. अनुष्का शेट्टी, नित्या मेनन, पूजा हेगडे, रश्मिका मंदानासारख्या देखण्या मंगलोरी नायिका तेलुगू-तमिळ सिनेसृष्टीने पळवल्याची खंत कन्नड प्रेक्षकांना अजूनही बोचते. याला कन्नड-तुळू वादाचीही पार्श्वभूमी आहे.

सध्या कन्नड सिनेसृष्टी एकापेक्षा एक दर्जेदार मसाला जॉनरचे सिनेमे देत असली, तरी हा कन्नड सिनेमाचा मूळ जॉनर नाही. समांतर सिनेमांनी घालून दिलेला आशयघन आदर्श अजूनही अस्सल कन्नड सिनेरसिक आपल्या काळजात साठवून आहेत. पुट्टण्णा कनगाल यांचे सिनेमे मुख्य आणि समांतर यांचा समन्वय साधणारे होते.

'सती-सुलोचना'सारखा पौराणिक सिनेमा असो किंवा 'गेज्जे पूजा'सारखा वेश्या व्यवसायाच्या विषयाला हात घालणारा सिनेमा असो. कन्नड सिनेमातलं स्त्रीजीवनाचं, आधुनिक स्त्रीवादाचं चित्रण हा नेहमीच कौतुकाचा विषय राहिलाय. तोच कन्नड सिनेमा मध्यंतरी मसाला जॉनरच्या नावाखाली द्विअर्थी संवाद, बरबटलेली पुरुषप्रधान मानसिकता, स्त्रीदेहाचं विकृत चित्रण मांडत राहिला, यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे. (KGF Movies)

पौराणिक, ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेत सद्य:स्थितीवर भाष्य करणं ही कन्नड सिनेमाची खासियत असली तरी तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमासारखा कन्नड सिनेमा राजकीय घडामोडींवर थेट भाष्य करायचं टाळतो. त्यामुळे वादग्रस्त राजकीय वर्तुळ आणि कन्नड सिनेमा कायमच एकमेकांपासून लांब राहत आलेत. हिंदू-मुस्लिम वादासारखा सदैव चर्चेचा विषय इथल्या सिनेमात नसतो. त्याउलट बर्‍याचदा गिरीश कर्नाडांची सेक्युलर विचारसरणी कन्नड सिनेमांमध्ये झळकताना दिसते.

'केजीएफ'मुळे देशभरातला प्रेक्षक कन्नड सिनेमाकडे नव्या आशेने बघतोय, यात दुमत नाही. खुद्द कन्नड भाषिक तरुणाईने काही काळ या सिनेजगताकडे पाठ फिरवल्यामुळे दशकभरापूर्वीच्या कन्नड सिनेमाला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. या कालावधीत आलेले आणि हिंदीत डब झालेले कन्नड सिनेमे शिवा-पुनीत राजकुमार, उपेंद्र, सुदीपसोबतच दर्शन, यश, रक्षित शेट्टी, ध्रुव शारजासारख्या सिनेनायकांची क्रेझ वाढवताना दिसतायत. 'होम्बेल फिल्म्स'सारख्या निर्मिती संस्था कन्नड सिनेमाला पॅन इंडिया रीलिजचं स्वप्न दाखवतायत.

आता प्रशांत नील, पवन कुमार, अनुप भंडारी, रक्षित शेट्टी, राम रेड्डी, राज शेट्टी अशा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणार्‍या; मातीतल्या गोष्टी सांगण्याची हौस असणार्‍या, ताज्या दमाच्या दिग्दर्शकांचा भरणा झालाय. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सिनेमा फेस्टिव्हलमध्ये नावाजलेला आणि कपोलासारख्या जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकाने गौरवला गेलेला राम रेड्डी लिखित-दिग्दर्शित 2015 चा 'तिथी' हा या अनुषंगाने महत्त्वाचा सिनेमा म्हणता येईल.

गुन्हेगारीला पौराणिक संदर्भांची झालर लावणारा 'गरुडा गमना वृषभ वाहना', खजिन्याचा वेध घेणारा 'अवने श्रीमन्नारायणा', गाणी नसूनही उत्तम प्रेमकहाणी असलेला 'दिया', नव्या पिढीचा रॉमकॉम 'किरीक पार्टी', स्त्रीमनाच्या भावनांचा वेध घेणारा 'नातिचरामी', न्यूयॉर्क बॉक्स ऑफिस गाजवणारा मिस्ट्री थ्रिलर 'रंगीतरंग', नोलनच्या सिनेमांची आठवण करून देणारा 'लुसिया'; हे सिनेमे कन्नड सिनेसृष्टीच्या प्रयोगशीलतेचे, सर्जनशीलतेचे आणि नावीन्यपूर्ण कथांचे दाखले देतायत.

आता 'केजीएफ : चॅप्टर 2' थिएटरमध्ये ठाण मांडून बसलाय. बेभान होऊन टाळ्या, शिट्ट्या वाजवणार्‍या अस्सल सिनेरसिकांसाठी हा सिनेमा बनवला गेलाय. 'केजीएफ'च्या घवघवीत यशाची खाण खणता खणता नव्या दिग्दर्शकांच्या रूपात मातीतलं सोनं कन्नड सिनेजगताला गवसलंय. मसाला जॉनरच्या नावाखाली टुकार, बटबटीत सिनेमे दाखवण्याचे दिवस आता संपलेत, हेच कन्नड सिनेसृष्टी 'केजीएफ'च्या निमित्ताने छाती ठोकून सांगते आहे.

प्रथमेश हळंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news