

बंगळूर, पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या 'विषारी साप' या टीकेला भाजपने जोरादार प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकचे भाजप आमदार बासनगौडा पाटील यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना 'विषकन्या' असे म्हणून पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगले तापले आहे. दर दिवशी येथे आरोप-प्रत्यारोपांचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत गुरुवारी गदग जिल्ह्यातील रॉन येथे जाहीर सभेत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर कर्नाटकातील विजापूर शहराचे आमदार बसनागौडा पाटील यांनी निवडणूक रॅलीला संबोधीत करताना सोनिया गांधींवर बोचरी टीका केली.
ते म्हणाले की, निवडणूक प्रचारादरम्यान, प्रसिद्धी मिळवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. पण हे खर्गे ज्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून उड्या मारत आहेत त्यांच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी चीन पाकिस्तानच्या एजंट म्हणून काम करत होत्या. सोनिया गांधी विषकन्या आहेत का? असा सवाल करून भाजप आमदाराने विरोधकांची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागत असल्याने भाजपचे नेतृत्व निराश झाले आहे. त्यातूनच त्यांनी खालच्या पातळीच्या टीकेचा आधार घेतला आहे. यातून त्यांचे कुरूप चारित्र्य स्पष्ट झाले आहे. काँग्रेस नेतृत्वाची बदनामी आणि अपमान करण्याच्या घाणेरड्या मानसिकतेचा आम्ही निषेध करतो. जर पंतप्रधान मोदींमध्ये जरासुद्धा शिष्टाई असेल तर त्यांनी बसनगौडा पाटील यांची भाजपमधून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करून काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.