

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघावर कोणत्याही एका पक्षाची सत्ता कायम राहिली नाही. या मराठी भाषिक मतदारसंघात 18 महिन्यांत दुसर्यांदा निवडणूक होत आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचा मुलगा विजयसिंग हे भाजपचे शरणू सलगर यांच्याविरोधात लढत आहेत. विजयसिंग यांचे भवितव्य मराठी मतदार ठरवणार असल्याने या लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या मतदारसंघात मराठी भाषिक मतदार तुलनेने अधिक आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा, हे तेच ठरवतील. काँग्रेसचे बी. नारायण यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होऊन भाजपचे शरणू सलगर हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसने बी. नारायण यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये गटबाजी झाली. यावेळी काँग्रेसने कर्नाटकचे दिवंगत माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचा मुलगा विजयसिंग यांना सलगर यांच्याविरोधात उभे केल्याने लढत अटीतटीची होत आहे.
महात्मा बसवेश्वरांची भूमी असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांचे विशेष लक्ष आहे. बीदर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. बसवकल्याण मतदारसंघात 153 गावे असून 2 लाख 18 हजार मतदार आहेत. या मतदारसंघात जनता दलाचे आमदार मल्लिकार्जुन खुबा हे दोनदा विजयी झाले होते. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार मतदारसंघाबाहेरील आहेत. काँग्रेसचे उमेदवार विजयसिंग हे विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यांचा कालावधी संपल्यामुळे त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले. भाजपचे उमेदवार शरणू सलगर हे एकेकाळी काँग्रेस नेत्यांचे खासगी सचिव होते. या मतदारसंघातील तरुण कामधंद्यानिमित्त हैदराबाद, पुणे येथे स्थलांतरित झाले आहेत. तिथेही उमेदवारांच्या प्रचार सभा झाल्या.