मंचर : कानडे बंधूंची आरोग्यदायी द्राक्षांची लागवड; देशासह परदेशातही मोठी मागणी

मंचर : कानडे बंधूंची आरोग्यदायी द्राक्षांची लागवड; देशासह परदेशातही मोठी मागणी
Published on
Updated on

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : कळंब मधील कानडे बंधू यांनी 'रेड ग्लोब' या आरोग्यदायी द्राक्षवाणाची बाग फुलवली आहे. द्राक्षाचा हा वाण कॅन्सर रोगापासून वाचवण्यासाठी गुणकारी असल्याने त्याला देश-विदेशातील ग्राहकांकडून या द्राक्षाला जास्त मागणी आहे. कळंबमधील कानडे कुटुंबाचा शेती हा परंपरागत व्यवसाय. गेल्या पंधरा वर्षांपासून ते द्राक्षशेती करतात.

प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रमोद कानडे, अनिल कानडे, नीलेश कानडे, सागर कानडे, नितीन कानडे, संजय कानडे या भावांनी आपली प्रगतशील शेतकरी ही ओळख जपली आहे. आठ एकरांत त्यांनी द्राक्षाच्या काळी, पिवळी, जंबो, नाना पर्पल, शरद, रेड ग्लोब आदी जातींची लागवड केली आहे. प्रमोद कानडे यांनी द्राक्ष शेतीचा विशेष अभ्यास करून यशस्वी उत्पादन घेतले आहे. संपूर्ण कुटुंबही त्यांना मदत करते. रेड ग्लोब जातीचा प्रयोग त्यांनी एका एकरात केला आहे. त्यातून दहा ते बारा टन माल निघतो.

सुरुवातीला हा माल लाल रंगाचा असल्याने लोक त्याला घेणे टाळत होते. मात्र, ते गुणकारी असल्याचे समजल्यानंतर मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. द्राक्ष विक्रीसाठी मलेशिया, थायलंड, श्रीलंका, बांगलादेश, दुबई आदी ठिकाणी निर्यात होतात. रेड ग्लोब या जातीला सध्या 110 ते 151 किलोप्रमाणे प्रतवारीनुसार मोठी बाजारपेठ आहे. द्राक्षांमधून एक एकरासाठी साधारण 12 ते 13 टन उत्पादन निघते. एकरी जवळपास साडेतीन लाखांपर्यंत खर्च येतो. सर्व खर्च जाऊन सात ते आठ लाखांपर्यंत नफा मिळत असल्याचे अनिल कानडे यांनी सांगितले.

पावसाचा कोणताही परिणाम नाही.
रेड ग्लोब या जातीवर पावसाचा, वादळी वारे, वातावरण बदलाचा कोणताही परिणाम होत नाही. इतर जातींवर मोठा परिणाम होऊन नुकसान सहन करावे लागते. स्थानिक बाजारातही चांगली मागणी असल्याचे कानडे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील द्राक्षांचे माहेरघर म्हणून कळंब, चांडोली परिसराला ओळखले जाते. आतापर्यंत बाजारात अनेक द्राक्षांच्या जाती आलेल्या आहेत. मात्र, आरोग्यदायी द्राक्ष म्हणून सध्या रेड ग्लोब द्राक्षाला बाजारात चांगली मागणी आहे.

                                  – प्रमोद कानडे, द्राक्ष उत्पादक, कळंब

द्राक्ष शेतीमुळे 50 हून अधिक जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कळंब परिसरात द्राक्ष बागायतदारांकडे मोठ्या प्रमाणावर नाशिक भागातील मजूर जोडपी आहेत. कळंब परिसरातील आदिवासी मजूरवर्गही मोठ्या प्रमाणात असतो.

                                  – अनिल कानडे, द्राक्ष उत्पादक, कळंब

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news