Kalyan Rape : आम्हाला सगळं सांगायचं होतसं बाळा, लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या करणा-या मुलीच्या आईचा आक्रोश

Kalyan Rape : आम्हाला सगळं सांगायचं होतसं बाळा, लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या करणा-या मुलीच्या आईचा आक्रोश
Published on
Updated on

डोंबिवली, भाग्यश्री प्रधान आचार्य : माझ्या मुलीने मला आधीच सगळं सांगितलं असतं तर तिच्या बाबतीत हे सगळं होऊ दिलं नसतं. एकदा तरी आम्हाला सगळं सांगायचं होतसं ग बाळा… हे शब्द होते पीडित मुलीच्या आईचे. ही हृदय हेलावणारी लांच्छनास्पद घटना कल्याण पूर्व येथे घडली आहे. एका पीडित मुलीने होत असलेल्या या गैरवर्तणुकीला कंटाळून आत्महत्येचा पर्याय स्वीकारल्याने कल्याण शहरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे त्रास देणाऱ्यांमध्ये धनदांडग्यांची मुले सामील असल्याचे समोर आले आहे.

या पीडित मुलीची इमारतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीणीने आणखी काही मित्रांशी पीडितेची ओळख करून दिली. इतकेच नव्हे तर पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या मित्रांच्या अत्याचाराला ती बळी पडली. दीड ते दोन वर्ष हा प्रकार घडत होता. अखेर तिने या सगळ्याला त्रासाला कंटाळून १२ तारखेला रात्री १०.३० वाजता ती रहात असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिचे नातेवाईक करत आहेत. विशेष म्हणजे ही मुलं उच्चभ्रू आणि बांधकाम व्यावसायिकांचे नातेवाईक असल्याने आमच्यावर दबाव आहे. तसेच आमच्या जीवाला देखील धोका असून आम्हाला संरक्षण देऊन न्याय मिळावा अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना केली.

आत्महत्येच्या वेळी काजल सोबत?

आम्ही सगळे १२ जून रोजी रात्री घरापासून पाच मिनिटांवर राहणाऱ्या मुलीच्या मामाकडे जेवायला गेलो होतो. त्यावेळी या मैत्रीण काजल हिने तिला काही काम आहे असे सांगत पुन्हा तिच्या राहत्या घराच्या गच्चीवर बोलावून घेतले. त्यावेळी मुलीने मी घरी जाते असे सांगत मामाच्या घरातून ती निघाली. त्यानंतर पीडित मुलगी आणि काजल गच्चीवर गेले असताना पीडितेची आई देखील घरी आली. थोड्याच वेळात खाली येते असे या मुलीने आईला सांगितले. तिच्या शब्दावर विश्वास ठेवून आई घरी गेली. आई घरात पाऊल ठेवते तोच काहीतरी पडल्याचा जोरात आवाज झाला. यावेळी जिन्यातून अंदाज घेत असतानाच काजल गच्चीतून खाली येताना आईला दिसली. यावेळी आईने काजलला थांबवले मात्र मुलगी पडली असल्याचे सांगत काजलने देखील तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे आम्हाला काजलने पीडितेला गच्चीवरून खाली ढकलल्याचा संशय असल्याचे मत पालकांनी व्यक्त केल आहे.

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

पीडित मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन गेलो. याच वेळी पोलिसांना देखील सांगितले अशी माहिती नातेवाईक देतात. त्यांनतर या घटनेची दखल घेत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवला. शव विच्छेदनाचा रिपोर्ट आला नसला तरी पोलिसांनी या मुलीचा मोबाईल तपासासाठी जप्त केला. तिने पुढच्या मोबाईलच्या नोटपॅडमध्ये लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. या मुलीला रोज डायरी लिहायची सवय असल्याचे यावेळी पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर मोबाईलमधील सुसाईड नोट वाचून पोलीस देखील थक्क झाले. यात विजय यादव, प्रमय तिवारी, सनी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, काजल जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा आदी नावांचा उल्लेख आहे, असे पोलिसांनी सांगितले.

डोंबिवलीच्या घटनेची कल्याणमध्ये पुनरावृत्ती

२३ सप्टेंबर २०२१ मध्ये डोंबिवलीतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून या व्हिडीओच्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर ३३ जणांनी विविध ठिकाणी सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या खळबळजनक प्रकारामुळे कल्याण-डोंबिवली सह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. त्याचीच पुनरावृत्ती काल कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या घटनेवरुन समोर आली आहे. दरम्यान आपल्याला होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा पीडितेने संपवली. त्यामुळे अशा विकृत नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वच स्तरातून मागणी होत आहे.

याप्रकरणी पीडित मुलीने तिच्या मोबाइलमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिच्या मैत्रिणीसह सात मुलांची नावे लिहून ठेवली आहेत. या सर्वांनी मिळून संगनमताने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असून त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. सुसाईड नोटच्या आधारे आठ जणांना अटक करून पुढील तपास पोलिस करत आहे.

– बशीर शेख , (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news