

राजगुरूनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आमदार दिलीप मोहिते पाटील समर्थक कैलास लिंभोरे, तर उपसभापती विठ्ठल वनघरे यांची निवड झाली. लिंभोरे- वनघरे यांना प्रत्येकी ११ संचालकांची मते मिळाली. तर विरोधी गटाच्या विजय शिंदे यांनी सभापती, तर सुधीर भोमाळे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यांना त्यांच्या पॅनेल मधील ७ संचालकांनी मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मोहिते पाटील यांना संधी असताना त्यांनी कार्यकर्त्यांना पदाची जबाबदारी दिली. पुढच्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उर्वरित संचालकांना संधी देणार असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची संस्था असलेल्या खेड बाजार समितीची निवडणूक एप्रील अखेर अत्यंत चुरशीने झाली. त्यात आमदार दिलीप मोहिते पाटील विरोधात सर्वपक्षीय असे दोन पॅनल होते. आर्थिक वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणुक जिल्ह्यात गाजली. निकालात आमदार मोहिते पाटील गटाला १० आणि विरोधकांना ६ जागा मिळाल्या होत्या. व्यापारी मतदार संघाचे दोन संचालकांपैकी एक आमदार मोहिते पाटील यांच्याकडे तर एक विरोधकांकडे गेले. त्यामुळे ११ विरोधात ७ असे बलाबल झाले. निवडणुक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी सभापती, उपसभापती निवडीसाठी बुधवारी (दि २४) नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. यावेळी सर्व १८ संचालक उपस्थित होते.
निर्धारीत वेळेत आमदार मोहिते पाटील यांच्या मार्गर्शनाखाली कैलास लिंभोरे, विठ्ठल वनघरे यांनी अर्ज दाखल केले. तर विरोधी गटाच्या माध्यमातून विजय शिंदे, सुधीर भोमाळे यांनी अर्ज दाखल केले. कोणीही माघार घेतली नाही. अखेरीस मतदान होऊन निवड प्रक्रिया पार पाडावी लागली. निवडीच्या घोषणेनंतर आमदार मोहिते पाटील समर्थकांनी बाजार समिती आवारात फटाके फोडून तसेच भांडार उधळून जल्लोष केला. दोन्ही बाजुच्या समर्थकांची मोठी उपस्थिती होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता. नवनिर्वाचित सभापती लिंभोरे, उपसभापती वनघरे यांच्यासह आमदार दिलीप मोहिते पाटील, संचालक जयसिंग भोगाडे, अशोक राक्षे, कमल कड, विनोद टोपे, हनुमंत कड, रणजित गाडे, सयाजी मोहिते, महेंद्र गोरे तसेच विरोधी गटाच्या माध्यमातून संचालक विजय शिंदे, सुधीर भोमाळे, माणिक गोरे,क्रांती सोमवंशी, सोमनाथ मुंगसे, अनुराग जैद सभागृहात उपस्थीत होते.
सुरेखाताई मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनीलबाबा राक्षे, अरुण चांभारे,पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, माजी सभापती अंकुश राक्षे,बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर , दिनेश कड, तसेच विरोधी गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, संदीप सोमवंशी यावेळी समिती आवारात उपस्थित होते.
सभापती कैलास लिंभोरे यांना मागच्या निवडणुकीत थोड्या मताने पराभव झाला होता. यावेळी त्यांनी सर्वाधिक म्हणजेच १२५४ पैकी ९७५ अशी विक्रमी मते घेऊन विजय मिळवला. त्यात पहिल्याच वेळी सभापती पदी निवड झाली. उपसभापती विठ्ठल वनघरे हे तालुक्याच्या आदिवासी भागातील संचालक आहेत. त्यांना आमदार मोहिते पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा उपसभातिपदाची लॉटरी लागली असल्याचे मानले जाते.