धार्मिक स्थळे, गडकिल्ले सज्ज ! जुन्नर तालुक्याला पाच धरणे, गडकिल्ले आणि लेण्यांचा वारसा

धार्मिक स्थळे, गडकिल्ले सज्ज ! जुन्नर तालुक्याला पाच धरणे, गडकिल्ले आणि लेण्यांचा वारसा
Published on
Updated on

संजय थोरवे

नारायणगाव : जुन्नर तालुक्याला पाच धरणांचा, गडकिल्ल्यांचा व लेण्यांचा वारसा लाभला असून, निसर्गाच्या विविधतेने हा तालुका नटला आहे, त्यामुळे या तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. उन्हाळी व पावसाळी पर्यटनासाठी या तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. पावसाळ्यात माळशेज, नाणेघाट, दार्‍या घाट येथील धबधबे व निसर्गसौंदर्य, तर उन्हाळ्यात येथील धार्मिक स्थळे व गडकिल्ले पर्यटकांना साद घालतात.

उन्हाळी पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला किल्ला शिवनेरी, जीवधन, हडसर, चावंड याबरोबरच येथे असलेली बौद्ध लेणी व अष्टविनायकांपैकी ओझर व लेण्याद्री या धार्मिक तीर्थक्षेत्रांबरोबरच कुकडी नदीचे उगमस्थान असणारे कुकडेश्वर व हरिश्चंद्रगड हे पाहण्यासारखे आहेत.

किल्ले शिवनेरी हे जुन्नर बसस्थानकापासून 1 किलोमीटर अंतरावर असून, हा किल्ला इतर डोंगरी किल्ल्यांपेक्षा मोठा आहे. शिवनेरी किल्ल्यावर श्री शिवाईदेवीचे मंदिर आहे. ही देवी जुन्नर परिसरातील आदिवासी व कोळी बांधवांची कुलदेवता आहे. शिवाईदेवीच्या नावावरून किल्ल्यास 'शिवनेरी' हे नाव पडले, अशी लोककथा आहे. दुचाकी, चारचाकी व व बस ही वाहने किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत नेता येतात. किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरी एक साखळदंडाची वाट आहे;

मात्र ती अत्यंत अवघड व धोकादायक आहे. शिवनेरीचा किल्ला म्हणून वापर यादव काळात सुरू झाला. यादव कालखंड ते पेशवे काळापर्यंत विविध राजवटींच्या स्थापत्यशास्त्राची विविधता किल्ल्याच्या बांधकामामध्ये आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सात दरवाजे आहेत. त्यामध्ये महादरवाजा, परवानगी दरवाजा, हत्ती दरवाजा, पीर दरवाजा, शिवाबाई दरवाजा, फाटक दरवाजा, कुलापकर दरवाजा अशी त्यांची नावे आहेत. किल्ल्यावर जाताना शिवाईदेवीचे मंदिर लागते. हे एका कड्याजवळ डोंगरात कोरलेल्या लेण्यांमध्ये आहे.

कुलापकर दरवाजा ओलांडल्यानंतर शिवकुंजाकडे जाणार्‍या सपाट रस्त्याच्या डाव्या बाजूला किल्ल्याच्या उत्तरेस खोल दरी आहे, तर उजव्या बाजूच्या कपारीमध्ये पाणपोढ्या खोदल्या आहेत. डोंगरउतारावर सपाटी आणि डोंगराचा चढ यांचा कोन साधून पाणपोढ्यांची खोदाई केली आहे. या दोन्ही पाणपोढ्या महत्त्वाच्या असून, किल्ल्यावरील पिण्याचे पाणी पुरवण्याचे एकमेव साधन आहे. किल्ल्यावरील इमारतींमध्ये अंबरखाना, शिवकुंज, कमानीची मशीद, सरकारवाड्याचे अवशेष, पोखरणी, बदामी तलाव, कडेलोट व घुमट असून, त्यांचे विशेष महत्त्व आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news