बहुविध प्लॅटफॉर्मवर काम करण्याशिवाय पत्रकारांना पर्याय नाही : पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव

बहुविध प्लॅटफॉर्मवर काम करण्याशिवाय पत्रकारांना पर्याय नाही : पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : माध्यमांच्या तंत्रज्ञानात गेल्या दशकभरात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे माध्यमांचा चेहरा-मोहराच बदलून गेला आहे. सध्या प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियाच्या सीमा धूसर होत चालल्या आहेत. त्यामुळे माध्यमांमध्ये होत असलेल्या या बदलांना सामोरे जाण्यासाठी पत्रकारांनी बलशाली होणे गरजेचे आहे. फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आदी सोशल मीडियामुळे पत्रकारांना आता बहुविध प्लॅटफॉर्मवर काम करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नसल्याचे पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी स्पष्ट केले.

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी 'जीवनगौरव पुरस्कारा'ला उत्तर देताना पत्रकारितेसमोरील आव्हानांचा ऊहापोह केला तसेच त्याला कसे तोंड द्यायला हवे, याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "देशातील मोबाईल वापरणार्‍यांची संख्या 90 कोटी आहे. तर त्यांच्याकडे असणार्‍या मोबाईलची संख्या 168 कोटी आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्याख्यानात सांगितले होते. त्यामुळे मोबाईलची संख्या देशातील लोकसंख्येपेक्षाही अधिक झाली आहे. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मला आज 'जीवनगौरव' पुरस्कार मिळाला, ही भाग्याची गोष्ट आहे. हा माझ्या एकट्याचा पुरस्कार नाही तर सर्वच पत्रकारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मी या पुरस्काराचा स्वीकार करतो. त्याचबरोबर हा पुरस्कार सर्व पत्रकांराना समर्पित करतो. कारण हा सर्व पत्रकारांचा सन्मान आहे.

आतापर्यंत मला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पांचजन्य, पद्मश्री आदी पुरस्कार मिळाले आहेत. परंतु, 'स्वामी विवेकानंद पुरस्कार' मिळाल्यानंतर आता दुसर्‍यांदा श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मला पुरस्कार देण्यात आला आहे.

श्री श्री रविशंकर यांच्याविषयी जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. ते केवळ भारताचेच नाहीत, तर जगद्गुरू बनलेले आहेत. जगातील 180 देशांत त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून शांतीचा संदेश दिला आहे. त्यांना जगातील अनेक विद्यापीठांनी तसेच तेथील सरकारांनी डॉक्टरेट पदवी, देशातील सर्वोच्च पुरस्कार दिला आहे तसेच अमेरिकेने त्यांना तेथील नागरिकत्वही दिले आहे. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे त्यांच्या हातून सन्मान होणे ही माझ्या दृष्टीने सौभाग्याची गोष्ट आहे. 'पुढारी'च्या लक्षावधी वाचकांमुळे 'पुढारी' केवळ वृत्तपत्र न राहता एक जनआंदोलन झाले आहे. त्यामुळे 'पुढारी' हे जनतेचे व्यासपीठ झाले आहे. जनजागृती करण्यात पुढारी नेहमीच अग्रेसर राहिले आहे. माझे वडील डॉ. ग. गो.जाधव यांनी सन 1937 मध्ये 'पुढारी' वृत्तपत्राची सुरुवात केली. त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काम केले, असे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटनेने लोकांना आचरण, विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पत्रकारांना वाटते की, आम्हाला विशेष स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मी स्वत: वकील आहे. पत्रकारांना असे वेगळे कोणतेही स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारी आणि कर्तव्येही येतात. देशात संसद, प्रशासन आणि न्यायपालिका या तीन खांबांवर लोकशाही उभी आहे. माध्यमाचा चौथा खांब आहे. या तिन्ही खांबांमध्ये सामंजस्य ठेवण्याची जबाबदारी चौथ्या खांबाची आहे, हे पत्रकारांनी लक्षात ठेवले पाहिजे. लोकशाहीला सध्या चांगल्या पत्रकारितेची अत्यंत आवश्यकता आहे. विरोधकांनी सरकारवर अंकुश ठेवण्याचे कार्य केले पाहिजे. गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर लिहून लोकांचे मनोरंजन करणे हे पत्रकारांचे काम नाही. त्यामुळे लोकशाहीची जबाबदारी सर्व पत्रकारांवर आहे. पत्रकार आणि साहित्यिक यांच्यात कोणताही फरक नाही. साहित्याला समाजाचा आरसा मानले जाते. वृत्तपत्रेदेखील समाजाचा आरसाच असतात. अनेक साहित्यिकांनी वृत्तपत्रांत काम केले आहे. पत्रकार हे कालचक्राला बांधलेले असतात. त्यामुळे पत्रकार हे साहित्यिकापेक्षा दोन पावले पुढे चालत असतो", असेही प्रतिपादन डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले.

मला अजून खूप काम करायचे आहे…

सन 1969 मध्ये मी संपादकपदाची धुरा संभाळली. त्यानंतर 50 वर्षे मी संपादक आहे. 'पुढारी'चा रौप्यमहोत्सव 1963 मध्ये झाला. सुवर्णमहोत्सव 1989 मध्ये झाला, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी कोल्हापुरात आले होते. गायिका लता मंगेशकर यांच्या हस्ते 1999 मध्ये हीरक महोत्सव साजरा करण्यात आला. तर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. 'पुढारी'च्या चारही महोत्सवामध्ये मी सहभागी झालो होतो.

'पुढारी'च्या शताब्दी महोत्सवातही मला सहभागी होता यावे यासाठी श्री श्री रविशंकर अर्थात गुरुजी यांनी आशीर्वाद द्यावेत, अशी इच्छा डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केली. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकांना दिला जातो, परंतु मी आता वयाची 78 वर्षे पूर्ण केली असली, तरी मला अजून खूप काम करायचे आहे, असे सांगत त्यांनी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या 'वुडस् आर लव्हली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अ‍ॅँड माईल्स टू गो बिफोर आय स्लिप…' या काव्यपंक्ती ऐकवल्या. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

मी विद्यार्थीच आहे…

मानवता आणि मानवीय मूल्यांकडे मी कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यामुळेच 'पुढारी' एक वेगळी भूमिका निभावण्यात सक्षम राहिला आहे. याचा मला अभिमान आहे. आमची तिसरी पिढी आता कार्यरत आहे. माझे सुपुत्र डॉ. योगेश जाधव यांच्याकडे चेअरमनपदाची जबाबदारी मी दिली आहे. कोणीही परिपूर्ण नाही. मी स्वत:ला विद्यार्थीच समजतो. कारण जीवनात अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले.

डॉ. प्रतापसिंह जाधव त्यांचे वर्णन काय करायचे? समाजातला आज एकही प्रश्न असा नाही की, ज्यावर डॉ. प्रतापसिंह जाधव बोलले नाहीत आणि ते बोलल्यानंतर परिणाम साधला गेला नाही. महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकर्‍याला उसाची एफआरपी मिळावी यासाठी वेगवेगळ्या शेतकरी संघटनांना एका टेबलवर बोलावले. कोल्हापूरचा टोल त्यांच्यामुळेच रद्द झाला. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, ज्यात पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अशी आपली वेगळी प्रतिमा तयार केली. मला काही नको, मी मॅनेज होणार नाही. मला कोणताही पुरस्कार नको. मला केवळ समाजाचे हित पाहायचे आहे, अशीच भूमिका त्यांनी कायम मांडली. त्यामुळेच आज बाळासाहेबांचा सत्कार व्हावा असे प्रत्येकालाच वाटत होते, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news