

सोशल मीडियामुळं माध्यमाचं आणि मतांचं लोकशाहीकरण झालं. प्रत्येकाला मत आधीपासून होतं. पण, सोशल मीडियामुळं त्याला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं. सोशल मीडियाच्या पोस्टमुळं सामाजिक तेढ वाढवण्याचे अनेक प्रसंग आपण अनुभवले आहेत. 'झुंड'मुळं (Jhund Hindi Movies) हेच पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळेचा 'झुंड' (2022) प्रदर्शित झाला आहे. नागराजचा पहिला हिंदी सिनेमा, तोही अमिताभ बच्चनसोबत. अशी सिनेमाची मस्त हवा झाली होती. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम करणारे अमिताभ दिसले. त्यानंतर महानायकाचे महामानवाला नमन, अशा सोशल मीडियावर पोस्ट पडू लागल्या. नागराजमुळं हे शक्य झालं, अशाही पोस्ट पडू लागल्या.
नागराजचे आधीचे दोन्ही सिनेमे म्हणजे 'फँड्री' (2013) आणि 'सैराट' (2016) जातव्यवस्थेवर नेमकं बोट ठेवणारे होते. दोघांमध्ये ग्रामीण भागातल्या जातीय संघर्षाची गोष्ट होती. 'झुंड'चं कथानक शहरात घडतं. त्यात प्रत्यक्ष जातीय संघर्ष नाही. तो 'आहे रे' आणि 'नाही रे' या दोन गटांची शहरातली गोष्ट सांगतो. शहरात माणसांची विभागणी त्यांच्या आर्थिक स्थितीवरून होते. गावाकडचा थेट जातीय संघर्ष इथं काही प्रमाणात कमी होतो.
प्रामुख्यानं 'श्रीमंत' आणि 'गरीब' असे दोन गट इथे असतात. शहरात उंच उंच वाढत जाणार्या इमारतींच्या पलीकडे वस्तीही पसरत असते. इमारतीच्या कंपाऊंड वॉलला लागूनच या वस्त्या वाढत असतात. तिथली व्यवस्था वेगळी असते. हातातोंडाची मारामारी असल्यानं मिळेल ते काम करणं आणि ते जर मिळालं नाही, तर चोर्यामार्या करणं हाच पर्याय असतो. यातूनच दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे, गर्द, व्हाइटनरसारखे नशा करण्याचे माहेरघर ही झोपडपट्टी बनते. यातून सततची भांडणं, तंटा, मारामारी असं बरंच काही घडत असतं.
साहजिकच, इमारतीतला 'पांढरपेशा' या लोकांकडे तुच्छतेनं पाहतो. इथली घाण, कळकट, किंचाळणारी माणसं त्याला नकोशी असतात. त्यामुळं इमारतीची कंपाऊंड वॉल जेवढी जास्त उंच करता येते तेवढी ते करतात. झोपडपट्टी अनधिकृत असते. इथली माणसं कचर्यात कचर्यासारखीच राहतात. यामुळं भिंतीपलीकडे इमारतीतला कचरा टाकला तर काय फरक पडतो? ते कुठले अधिकृत आहे? कुठे तक्रार करणार? झालं तर, या कचर्यातल्या प्लास्टिकमुळं त्याचे दोन पैसे सुटतील, अशी मानसिकता तयार झालेली असते.
झोपडपट्टीत राहणार्यांनी आपले असे जगण्याचे मार्ग स्वीकारलेले असतात. आर्थिक विषमतेमुळं बिल्डिंगमध्ये राहणार्यांबाबत त्यांच्या मनात राग असतो. तिथली माणसं आपल्याला तुच्छतेनं वागवतात, हुसकावून लावतात याचा रागही त्यांना असतो. या रागातून आणि खडतर जगण्यातून त्यांच्यात बेदरकारी आलेली असते. आज मज्जा करूया. जगलो वाचलो तर उद्याचं उद्या बघू, अशी एक मानसिकता तयार झालेली असते. मग अशा वेळी 'जयंती', मग ती शिवाजी महाराजांची असो किंवा बाबासाहेब आंबेडकरांची.
डिजेच्या मोठ्या आवाजात हे लोक आनंद शोधतात. बेधुंद होऊन नाचतात. दुसर्या दिवशी उठतात. काल किती मज्जा केली, अशा गप्पा मारत आपल्या कामाला लागतात. आपण काय साजरं केलं, कशासाठी साजरं केलं याचं भान त्यातल्या बहुतांश लोकांना नसतं. बस्स. मज्जा आली, आपलं दु:ख काहीवेळ का होईना त्या डिजेच्या आवाजात हरवलं, याचा आनंद जास्त असतो.
शुद्धीत आल्यावर गरिबी पुन्हा 'आ' वासून असते. तिचा त्यांना सामना करायचा असतो. अशाच उपेक्षित जगणार्या मुलांच्या आयुष्यात फुटबॉल येतो. गांजा, व्हाइटनरच्या नशेसारखीच त्याची सवय लागते. विजय बोराडे नावाचा प्रोफेसर त्यांना फुटबॉलचा नाद लावतो. यातून त्याचं चांगलं होतं. असंही चांगलं जगू शकतो, असं या मुलांना वाटायला लागतं. (Jhund Hindi Movies)
तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय खस्ता खाव्या लागल्या याचीही जाणीव होते. योग्य मेहनत केली, चांगली माणसं भेटली, त्यांच्याबरोबर राहिलो तर मानसन्मान सर्व काही मिळतं, हे जाणवू लागतं. अशी ही अगदी साधीसोपी 'झुंड'च्या कथानकाची मांडणी आहे. गोष्ट साधी असली तरी प्रभावी आहे. शहरातल्या 'नाही रे' गटाचा संघर्ष प्रचंड आहे. शिवाय गावातल्या 'नाही रे' गटाला आपलं अस्तित्व आहे, हे सांगण्यासाठी दरदर भटकावं लागतं. डिजिटल इंडियातला 'भारत' अजूनही चाचपडत आहे, असं थेट भाष्य नागराज 'झुंड'मधून करतो. 'झुंड' सिनेमा सकारात्मक आहे. संघर्षाकडून उन्नतीकडे असा विचार देऊन जातो.
झोपडपट्टीतलं जगणं पडद्यावर पहिल्यांदा आलेलं नाही. ते आधीही दिसलं होतं. 'सलाम बॉम्बे' ते 'स्लमडॉग मिलेनियर'पर्यंत. 'धारावी' (1992) सारख्या सिनेमात जागतिकरणाच्या फेर्यात वाढत जाणार्या स्वप्नाळू आम आदमीची गोष्ट जास्त सिनेमॅटिक होती. 'झुंड'बाबतीत थोडंसं वेगळं घडलंय. लोकांच्या मनात नागराजच्या आधीचा सिनेमांचा प्रभाव जास्त आहे. मेन स्ट्रीम हिंदी सिनेमात पहिल्यांदा आंबेडकर जयंती साजरी होताना दिसली. यामुळंच मग नागराज आंबेडकरवादी आहे. जातीपातीवरचा सिनेमाच बनवतोय, असा मानणारा एक मोठा गट तयार झाला. 'झुंड' आवडलेले आणि 'झुंड'ला नावे ठेवणारे असे थेट दोन गट सोशल मीडियावर पडले.
चित्रपट बाजूला राहिला आणि नागराज कसा जातीयवादी आहे, यावर चर्चा घडल्या. वाद झाले. यातून एका नवख्या मराठी भाषिक दिग्दर्शकानं हिंदीतली चौकट मोडली, ही बाब मागे राहिली. हा वाद प्रस्थापित आणि उपेक्षित समाज असा वाढला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्शर असलेल्या काही जणांनी नागराजच्या सिनेमावर भाष्य केलं. यातून तुमचा 'झुंड', तर आमचा 'पावनखिंड.' अशा पोस्टचा खच सोशल मीडियावर पडायला लागला. (Jhund Hindi Movies)
मुळात इथं एक लक्षात घ्यायला हवं की, 'पावनखिंड' आणि 'झुंड'ची कुठल्याच बाबतीत तुलना होणं शक्य नाही. 'पावनखिंड' हा ऐतिहासिक संदर्भ असलेला सिनेमा आहे, तर 'झुंड' हा उपेक्षितांचं प्रतिनिधित्व करतो. दोन्ही सिनेमांचा पोत आणि मांडणी वेगवेगळी आहे.
पण सोशल मीडियावर पडलेल्या दोन गटामुळं जो तो आपापला सिनेमा रेटताना दिसला. बरं, हे फक्त मराठी प्रेक्षक आणि महाराष्ट्राच्या बाबतीतच घडत होतं. उर्वरित भारतात 'पावनखिंड' आलाय याची कल्पना नाही. तर 'झुंड' हा अमिताभचा सिनेमा आहे. तो 'सैराट'वाल्या नागराजनं बनवलाय एव्हढंच यांच्या ध्यानीमनी आहे. 'सैराट'मुळं नागराजचा फॅनफॉलोअर भारतभर वाढला. याचा फायदा 'झुंड'ला झाला. तिथला प्रेक्षक अमिताभ आणि त्यातली गोष्ट बघण्यासाठी सिनेमा थिएटरात जातोय. पण महाराष्ट्रात हे असं घडताना दिसत नाहीय. जातीची झापडं असलेली दोन्ही बाजूची माणसं आपला मुद्दा रेटताना दिसतायेत.
सोशल मीडियामुळं माध्यमाचं आणि मतांचं लोकशाहीकरण झालं. प्रत्येकाला मत आधीपासून होतं. पण सोशल मीडियामुळं त्याला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं. याचा उपयोग एखादी सकारात्मक गोष्ट पसरवण्यापेक्षा एकमेकांना कमी लेखण्यात आणि आपल्या विरोधात असलेल्यांवर चिखलफेक करण्यात जास्त व्हायला लागला. जे आपल्या मनाला पटत नाही, त्यावर थेट फुली मारून सोशल मीडियावर व्यक्त होणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. यातून वाढणारा संघर्ष हा भयंकर रूप घेऊ लागला आहे. सोशल मीडियाच्या पोस्टमुळं सामाजिक तेढ वाढवण्याचे अनेक प्रसंग आपण अनुभवले आहेत.
'झुंड'मुळं हेच पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं आहे. सोशल मीडियामुळं अभिजन, अभिजात विरोधात उपेक्षित असा वर्ग संघर्ष वाढीला लागला आहे. वेगवेगळे मीडिया सेल या वातावरणाचा फायदा उचलत आपली राजकीय भाकरी भाजत आहेत. यामुळं समाजातली अस्वस्थता कमी करण्यापेक्षा ती जास्तीत जास्त कशी वाढेल आणि आपल्याला त्याचा फायदा कसा होईल, याची सोय पाहतायेत.
या मीडिया सेल्सला राजकीय वरदहस्त असल्यानं आणि राजकारणाचा थेट समाजकारणाशी थेट संबंध असल्यानं तेढ वाढत जाणार हे 'झुंड' चित्रपटावरून तयार झालेल्या सोशल मीडिया ट्रेडनं दाखवून दिलंय. यातून भविष्यात दोन्ही बाजूकडून आपापले मत मांडण्यासाठी एकांगी विचारधारेची चित्रपट निर्मिती किंवा साहित्यनिर्मिती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळं समाजस्वास्थ बिघडणार आणि त्यापुढे जाऊन देश आणखीन अस्वस्थ होत जाणार यात शंका नाही.
नरेंद्र बंडबे