

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा महायुती व महाविकास आघाडीत कायम आहे. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. तेथे शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत, तर महाविकास आघाडीतून मूळ शिवसेनेची जागा असल्याने ती ठाकरे शिवसेनेकडे जाणार, अशी चर्चा आहे. ठाकरे हे आपला उमेदवार उभा करणार? राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार? की नव्याने महाविकास आघाडीत सहभागी होणार्या वंचित बहुजन आघाडीला ही जागा सोडली जाणार, यावरच आता चर्चा सुरू आहे.
राजू शेट्टी यांनी सुरुवातीपासून महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतर राखून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मध्यंतरी त्यांनी दोनवेळा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुरुवातीपासून ठाकरे शिवसेनेच्या कोट्यात ही जागा जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-शेट्टी भेटीने महाविकास आघाडीचा पाठिंबा शेट्टींना मिळणार, याची चर्चा सुरू झाली. मात्र, शेट्टी आघाडीत जायला तयार नाहीत व महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार नाही, अशी स्थिती आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना शेट्टी यांचा आघाडीत प्रवेश हवा आहे. शेट्टी आघाडीत प्रवेश करतील, असे वाटत नाही. त्यांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. मात्र, शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही, तर महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचवेळी राजू शेट्टी यांनी आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यायला तयार आहे; मात्र आपण महाविकास आघाडीत जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.