भिंद्रनवालेचे नवे अवतारकार्य संपवायला हवे!

भिंद्रनवालेचे नवे अवतारकार्य संपवायला हवे!
Published on
Updated on

दीप सिद्धू आज हयात नसला, तरी त्यानेच 'पंजाब दे वारिस' ही संघटना जन्मास घातली होती व दुबईत व्यवसाय करणार्‍या अमृतपालशी त्याचे निकटचे संबंध होते.

1980 च्या दशकातील पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा नवा अवतार धारण करून खलिस्तानवादी चळवळ आता अधिक तीव्र करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमृतपाल सिंग व त्याच्या पाठीराख्यांनी पंजाब राज्यात दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. 'वारिस दे पंजाब' म्हणजे पंजाबचे खरे वारसदार या नावाच्या संघटनेखाली त्यांनी पंजाब राज्यात धुडगुस घालून कायदाही हातात घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. पंजाब राज्यातील काही पोलिसांना हाताशी धरून व न जुमानणार्‍या पोलिसांना 'हम करे सो कायदा'चा बडगा दाखवून पोलिसांबरोबरच निष्पाप लोकांनाही वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला आहे.

दरम्यान, राज्यात अफवा पसरून आणखी काही भयंकर प्रसंग ओढवू नये म्हणून मोबाईल, इंटरनेट सेवा आणि एसएमएस सेवाही बंद करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईतून अमृतपालसिंग निसटला असला तरी त्याच्या 78 समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही धडक मोहीम चालूच राहणार असून, अमृत नावाच्या या विषवल्लीला व त्याच्या समर्थकांना जंग जंग पछाडले जात आहे. आज ना उद्या अमृतपाल जिवंत किंवा मृत हाती लोगल व त्याचे समर्थकही आम्ही शोधून काढण्यास यशस्वी होऊ, असा राज्याच्या पोलिसांचा कयास असला तरीही विनाविलंब कठोर कारवाई करता यावी म्हणून केंद्राचीही मदत घेण्यात येत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ज्या मार्गाने इंदिरा गांधी यांचा काटा काढण्यात आला, त्याच मार्गाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काटा काढू, अशी उघड धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत बोलावून योग्य त्या सूचना केल्या आहेत.

विशेष म्हणजे या राज्यातील 'आप' सरकारवरही केंद्र सरकार पूर्णपणे विसंबून राहू इच्छित नाही व याचा थेट संबंध वर्षभरापूर्वी या राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे वेधला जात आहे. या निवडणुकीत आम्हाला काँग्रेस वा भाजपा हे परिपक्व राष्ट्रीय पक्ष नकोत, त्यापेक्षा आम आदमी पार्टीला आम्ही जवळ करू, असे मानणार्‍या तथाकथित खलिस्तानधार्जिण्या लोकांची भेट आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली होती, असा जो बोलबाला होता, त्यात तथ्य आढळून आल्याची समज बळकट होत आहे. या पार्श्वभूमीवर अमृतपालला जिवंत पकडण्यात यश आले किंवा त्याचा अत्यंत जवळच्या साथीदारास पोलिसी हिसका दाखवून वदविण्यात आले तर काय खरे, काय खोटे हे कळण्याबरोबरच खलिस्तानवादी चळवळ कुठेपर्यंत राज्यात, देशात व परदेशात हात पसरत आहे, याचाही छडा लागू शकेल, असे केंद्राला वाटते व ते सध्याच्या खलिस्तानी चळवळीचे लक्ष्य गृहीत धरता बरोबरच आहे, हे पटू लागते.

आज पंजाबमधील तरुणाईला चिथावण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंजाब राज्यात विकासाबाबत विशेष काही झाले नाही. येथील संस्कृती, भाषा यांच्यावर भर देण्यात आला नाही, असे अर्धसत्य किंवा पूर्ण खोटे सांगून तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करावी व त्या माध्यमातून खलिस्तानची स्थापना करावी, असा सरळ मामला आहे.

जे राष्ट्रीय विचारसरणीचे नेते आहेत, मग ते कुठल्याही राजकीय पक्षात का असेनात त्यांना हे मुळीच मान्य नाही; पण जे बेकार आहेत, राष्ट्रीयत्वाचा ज्यांच्यात अभाव आहे, अशा युवकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आपल्याकडे त्यांचा मोर्चा वळविण्याचे या चळवळीतील लोकांचे काम चालू आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील पंजाब हे एक असे राज्य आहे की, या राज्यामध्ये अमली पदार्थांच्या विळख्याने तरुणाईला जखडून टाकले आहे. जे बेरोजगार, अर्धशिक्षित व आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे आहेत, असे तरुण खलिस्तानवाद्यांकडून मिळणार्‍या 'इझी मनी'ला बळी पडून अमली पदार्थांच्या आहारी जातात व मग पैसे देणारे जे करायला सांगतील तो मार्ग विनाविलंब पत्करतात.

आज या चळवळीकडे पंजाब राज्याबरोबरच अख्ख्या देशाचे लक्ष लागून असले तरी दोन वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून काही अराष्ट्रीय हिंसक प्रवृत्तीच्या तरुणांनी अप्रत्यक्षरीत्या यात शिरकाव केला होता व त्यातीलच एक म्हणजे दीप सिद्धू हा होय. या सिद्धूने सर्वांना बुद्धू बनवीत शेतकरी आंदोलनात थेट लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला व त्यातून मग आंदोलनास हिंसक वळण लागले होते. हा दीप सिद्धू आज हयात नसला तरी त्यानेच 'पंजाब दे वारिस' ही संघटना जन्मास घातली होती व दुबईत व्यवसाय करणार्‍या अमृतपालशी त्याचे निकटचे संबंध होते.

दीप एका अपघातात ठार झाल्यानंतर मग अमृतपालने ही संघटना आपल्या ताब्यात घेतली व खलिस्तानची निर्मिती करण्यासाठी जे शीख, ब्रिटन, जर्मन, कॅनडा या विदेशी राष्ट्रांत विविध उद्योग-व्यवसायांच्या निमित्ताने गब्बर झालेले आहेत, त्यांच्याकडून लाखो-कोट्यवधी रुपयांचा मलिदा घेऊन पैशातून सगळ्यांना विकत घेऊन ही चळवळ चालवली जाते. यासाठी अमृतपाल विदेशातून या देशात प्रकटला तो अगदी भिंद्रनवालेच्या स्टाईलमध्ये. त्याच्यासारखाच वेष, त्याच्यासारखेच सोबतीला अंगरक्षक आणि त्याच्यासारखेच कारनामे. म्हणून भिंद्रनवालेच्या या नव्या अवताराचे व त्याच्या समर्थकांचे अवतार कार्य जितक्या लवकर संपवता येईल, तितक्या लवकर संपवणे हे जसे पंजाब राज्यासाठी हितकारक तसेच ते या देशासाठीही हितकारक आहे.

– शंभू भाऊ बांदेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news